

हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक कोरोनरी आर्टरी डिसीज (उअऊ), हृदयाचे अनियमित ठोके, अलीकडील हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपित हृदय उपकरण आणि फुफ्फुसीय धमनी रोग यांसारख्या हृदयविकाराच्या समस्यांनी ग्रासलेल्यांना लांबचा प्रवास करण्याची काळजी वाटते.
स्वतःचे मूल्यमापन करा : तुमच्या डॉक्टरांना भेटावे, तुमच्या हृदयाच्या चाचण्या जसे ईसीजी, इकोकार्डिओग्राफी आणि तणावाच्या चाचण्या कराव्यात, तुमच्यासाठी प्रवास करणे सुरक्षित आहे का याची खात्री करावी. छातीत दुखणे, दम लागणे किंवा थकवा यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना कळवावे. प्रवासाच्या 1-2 महिने आधी स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल तर प्रवास करू नका. कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी जाऊ नका.
लसीकरण करा : प्रवासापूर्वी कोव्हिड-19 विरुद्धचे संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे. हृदयरोगी या आजाराला बळी पडतात आणि कोव्हिडची लागण होण्याच्या 'उच्च-जोखीम' श्रेणीत येतात. तेव्हा सावध राहावे.
औषधे सोबत ठेवा : प्रवास करत असाल तर तुम्हाला औषधांचा साठा सोबत बाळगणेे आवश्यक आहे. जर काही कारणास्तव तुमचा मुक्काम वाढला तर काही जास्तीची औषधे जवळ असू द्या. प्रवास करत असताना औषधे वगळू नका. गोंधळ टाळण्यासाठी औषधाला लेबल लावावे.
फ्लाईटमध्ये योग्य काळजी घ्यावी : केवळ बसून न राहता थोड्या फार शारीरिक हालचाली करा. आरामदायी पादत्राणे निवडा, हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि आवश्यक असल्यास कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घाला. जर तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा (शिरांसंबंधीचा थ्रोम्बोसिस) धोका जास्त असतो. तुम्ही बराच वेळ बसून राहिल्यास रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळे पायांमध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून पाय हलवत राहावे.
संतुलित आहार आणि हलका व्यायाम करावा : तुम्ही सुट्टीवर असलात
तरी, पौष्टिक अन्नाचे सेवन करून तुमच्या हृदयाची योग्य काळजी घ्या. जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा अतिरेक करू नका.
खारट पदार्थ, अल्कोहोल आणि धूम्रपानाचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा. सुट्टीत
चालणे, धावणे किंवा काही व्यायाम करणे सुरू करा.
सावधगिरी बाळगावी : छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अगदी थकवा यांसारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वरील लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. संपूर्ण प्रवासात तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. हृदयावर दबाव आणतील अशा कोणत्याही क्रियाकलापांची निवड करू नका. अतिश्रम करू नका.
कोव्हिडचे निर्बंध हटविण्यात आल्यामुळे लोकांनी उन्हाळी सुट्टीचे नियोजन केले आहे. मात्र, जर हृदयाची समस्या असेल तर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.