

अकाेला; पुढारी वृत्तसेवा : अकोला शहरातून एक उतावळा नवरा लग्नाआधीच भावी पत्नीला घेवून पळाल्याची घटना अकोट फैल भागात घडली. याप्रकरणी भावी जावयाविरुद्ध अकोट फैल पोलिसात सासुबाईने तक्रार दाखल केली आहे. भावी जावई अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. (Before Marriage)
शहरातील अकोट फैल भागात राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा अमरावती येथील एका युवकासोबत झाला होता. परंतु मुलीचे वय कमी असल्याने, त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये लग्न ठरविले. मुलीचे वय १७ वर्ष ६ महिने होते, जानेवारी महिन्यात मुलीचा साखरपुडा आटोपला आणि कुटूंबियांनी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा विवाह निश्चित केला. परंतु भावी जावयाने त्यापूर्वीच मुलीला काही कारणास्तव फूस लावून पळवून नेले. मुलीसोबत भावी जावयाचे फोनवर नियमित बोलणे व्हायचे. दरम्यान मुलीला बरे वाटत नसल्याने, अमरावती येथील भावी जावई २५ मार्च रोजी मुलीला भेटण्यासाठी घरी आला. जावई म्हणून सासुनेही आदरातिथ्य केले. सासुला काही काम असल्यामुळे ती बाहेर निघुन गेले. घरी परतल्यावर भावी जावई आणि मुलगी दिसून आली नाही. दोघेही बाहेर गेले असतील. असा अंदाज तक्रारदार महिलेने बांधला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही परतले नसल्याने शेवटी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणात अकोट फैल पोलिसांनी भावी जावयाविरूद्ध गुन्हा दाखल केला.