

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: हरियाणातील (Haryana Violence) नूहमधील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीने काढलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान मेवात जिल्ह्यातील नूहमध्ये सोमवारी दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली. तसेच हल्लेखोरांनी अनेक वाहनेही पेटवून दिली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दरम्यान, नूहमधील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी नूह (Haryana Violence) येथे प्रशासनाने धर्मगुरू आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला नुहचे आमदार आफताब अहमद, फिरोजपूर झिरकाचे आमदार मम्मन खान उपस्थित होते. नुहचे उपायुक्त, प्रभारी एसपी नरेंद्र बिजार्निया बैठकीला उपस्थित होते. नूह पोलिसांनी २० हून अधिक हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
नूह जिल्ह्यात आज (दि.१) संचारबंदी लागू केली आहे. नूहमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे, परंतु आज कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. नूह आणि इतर भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. ही घटना दुर्दैवी आहे. मी सर्व जनतेला राज्यात शांतता राखण्याचे आवाहन करतो. दोषींना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे ट्विट हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, नूह हिंसाचारात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ होमगार्डांचा समावेश आहे. तर सुमारे ४५ लोक जखमी झाले आहेत. यामध्ये ७ पोलिस जखमी झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत २० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात वाहने जाळण्यात आली आहेत, त्यांची मोजणी सुरू आहे.
हरियाणातील नूह येथे विश्व हिंदू परिषदेच्या एका मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर भडकलेल्या दंगलीत अनेक जण जखमी झाले, तर कित्येक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. गावात तणाव असून, पोलिसांनी ध्वजसंचलन करून शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, नूहमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या युवा शक्ती बजरंग दलाच्या वतीने नलहद महादेव मंदिरात जलाभिषेक केल्यानंतर ब्रजमंडळ जलाभिषेक यात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक एका भागातून जात असताना या मिरवणुकीवर जोरदार दगडफेक करण्यात आली व जमावाने मिरवणुकीतील दोन वाहने पेटवून दिली. यामुळे एकच गोंधळ माजला व दोन्ही बाजूंकडून दगडफेक सुरू झाली.
हेही वाचा