वास्को ः पुढारी वृत्तसेवा मासळी विक्रेत्यांनी शनिवारी आपला मुक्काम देव दामोदर ट्रस्टमध्ये उभारण्यात आलेल्या शेडमध्ये हलविला. त्यामुळे आता जुने मासळी मार्केट पूर्णपणे जमीनदोस्त करण्याच्या कामाला वेग येणार असल्याने वास्कोवासीयांनी समाधान व्यक्त केले.
सदर मासळी विक्रेत्यांना मार्केटातून शेडमध्ये स्थलांतर करण्यासाठी आपले प्रयत्न यशस्वी झाले असले, तरी हे मार्केट उभारण्यासाठी काहीजणांनी यापूर्वी घेतलेले परिश्रमही कारणीभूत असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.
मुरगाव पालिका व मासळी विक्रेत्या संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्याने मासळी विक्रेत्यांनी मार्केट रिकामे करून पालिकेच्या स्वाधीन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बुधवारपासून जुने मासळी मार्केटचे छप्पर मोडण्याचे काम सुरु झाले होते. मासळी विक्रेत्या मात्र काही कारणास्तव शेडमध्ये स्थलांतर करण्याऐवजी त्या मार्केट लगतच्या रस्त्याकडेला मासळी विक्री करू लागल्या होत्या. त्यामुळे त्या तेथे जातात की नाही, असा प्रश्न काहीजणांनी उपस्थित केला होता.
शुक्रवारी आमदार साळकर यांनी त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी आम्ही शेडमध्ये जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शनिवारी सकाळी त्या शेडमध्ये स्थलांतर केले आहे. तेथे त्यांना काही समस्या उद्भवल्यास त्या दूर करण्यात येतील, असे साळकर यांनी सांगितले.