मडगाव : पुढारी वृत्तसेवा : कासव पकडण्यासाठी गेलेले नूने गावचे दोन तरुण पाण्यात बुडल्याने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सांगेवर शोककळा पसरली. पारंपरिक पद्धतीने खोल पाण्यात बुडून कासव पकडण्यासाठी दोघेही गेले असता खोल डोहात अडकून पडले. रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्याचे काम सुरू होते. सतीश पावटो गावकर (३५) आणि रामदास पुरसो गावकर (४०) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.
सतीश व रामदास शनिवारी सायंकाळी नदीत कासव पकडण्यासाठी उतरले होते. तीन तास उलटून सुद्धा दोघेही पाण्याबाहेर आले नाहीत. गावकऱ्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. नदीचा काठ पिंजून काढण्यात आला पण त्यांचा ठावठिकाणा लागू शकला नाही. नदीच्या जवळ असलेल्या गुहेत ते अडकले असावेत, अशी शक्यता व्यक्त करून तिथेही शोधाशोध करण्यात आली. पण, पाणी जास्त असल्याने गावकऱ्यांना ते सापडू शकले नाहीत.
ग्रामस्थांनी सांगे पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. रात्री अंधारात त्यांचा शोध घेणे अशक्य होते त्यामुळे नौदलाच्या पाणबुड्यांची मदत घेण्या आली.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच ते रात्री घटनास्थळी दाखल झाले. वॉटर पंपच्या साहाय्याने पाण्या बाहेर काढून त्यांचा शोध घेतला असता दोघेही खडकाळ भागात अडकल्याचे दिसून आले.