गोवा प्रदूषणमुक्त करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; झुआरी पुलाचे उद्घाटन

 नितीन गडकरी 
(File Photo)
नितीन गडकरी (File Photo)

पणजी / वास्को / मडगाव : पुढारी वृत्तसेवा : गोवा सुंदर राज्य असून, येथे प्रदूषणमुक्त प्रकल्प व वाहनांना संधी मिळायला हवी. हवा, जल व वायू यांचे प्रदूषण होऊ नये याची काळजी घ्या. राज्याला आणखी अनेक प्रकल्प देऊ. येत्या काळात गोवा देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

झुआरी नदीवर बांधलेल्या नव्या केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, सभापती रमेश तवडकर, मंत्री माविन गुदिन्हो, गोविंद गावडे, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर खासदार विनय तेंडुलकर, फ्रान्सिस सार्दिन, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे, आमदार अँथनी वाझ, आलेक्स सिक्वेरा, वीरेश बोरकर, दिगंबर कामत आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, आपल्या काळात सहा विश्वविक्रम झाले. झुआरी पुलावरील गॅलरीचे काम पूर्ण करणार आहोत. ही गॅलरी जागतिक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. गोव्याला ३५ हजार कोटींचे प्रकल्प देऊ, असे प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केले.

गोव्यात १७ हजार ७२६ कोटी खर्चून भारतमाला प्रकल्प उभारला जाणार आहे. झुआरी पुलाचा ८० टक्के भाग पूर्ण होऊन एका मार्गाचे उद्घाटन होते, हा आनंदाचा क्षण आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची स्वप्ने साकार होत आहेत. पत्रादेवीपासून गोव्याबाहेरून कर्नाटकात जाणारा रिंग रस्ता बांधण्यावर नक्कीच विचार करू, असेही गडकरी यांनी सांगितले. झुआरी पूल हा जगातील ८ पुलांत समावेश होणार असल्याचे प्रतिपादन केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद व नितीन गडकरी यांचे सहकार्य यामुळे गोव्यात अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले. आज मनोहर पर्रीकर यांची प्रकर्षाने आठवण होते. कारण झुआरी पूल हे त्यांचे स्वप्न होते. ते आज पूर्ण होत आहे. पर्रीकर यांचा जोश गोमंतकीयांना मिळाला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देऊन गोमंतकीय विकासासोबत राहिले आहेत.

२० हजार कोटीपेक्षा जास्त निधी विकासकामावर खर्च केला आहे. पुलावर टॉवर, गॅलरी व रेस्टॉरंट होणारच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी नागपूर धर्तीवर झुआरी पुलाच्या भोवती म्युझीकल गार्डन बांधावे व गोव्याला किनारी भागातून रिंगरोड बांधण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांच्याकडे केली. केंद्र सरकारच्या मदतीने गोव्याचा भरीव विकास होत आहे. मोप विमानतळ आयुर्वेद इस्पितळ आदी अनेक प्रकल्प केंद्राने गोव्याला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याच्या विकासाकडे जास्त लक्ष दिले आहे. गोव्यातील लोकांना या जागी वाहतूक कोंडीचा त्रास झाला, मात्र त्यावर सरकारने पुलाच्या रूपाने तोडगा काढला आहे. असे प्रतिपादन श्रीपाद नाईक यांनी केले. शुआरी पुलाच्या उद्घाटनामुळे वाहनचालक नागरिक व पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडी नाहीशी होणार असल्याचे काब्राल म्हणाले.

'त्या' कामगारांना २ लाख

झुआरी पूल बांधताना तीन कामगारांचा मृत्यू झाला. बांधकाम कंपनीने त्यांना आर्थिक मदत केली. मात्र, गोवा सरकारतर्फे त्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

दृष्टीक्षेपात पूल…

• २,५३० कोटी खर्चून अत्याधुनिक पद्धतीने बांधलेला देशातील दुसरा सर्वात लांबीचा केवल स्टेड पूल.
• वेर्णा ते बांबोळी दरम्यान तीन टप्प्यांत काम करून एकूण रस्ता व उड्डाणपुलांची बांधणी.
• रस्ता, उड्डाणपूल आणि नदीवरील पुलाची मिळून लांबी १३.६३५ किलो मीटर. फक्त पुलाची लांबी ६४० मीटर.
• अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब, अभियांत्रिकीकरण आणि बांधकामाचा एक आकर्षक मॉडेल प्रकल्प नमुना.
• जुना झुआरी पूल कमकुवत झालेला असल्यामुळे तेथून अवजड वाहनांची वाहतुक अनेक वर्ष वंद आहे. नव्या पुलावरून अवजड वाहनांची वाहतुक सुरू होणार.
● पहिल्या टप्प्यातील चारपदरी पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. दुसरा टप्पा हाही चौपदरी होणार असून त्याचे काम मार्च २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे.
• उत्तर व दक्षिण गोव्याला जोडणारा महत्त्वाचा सेतू. पर्यटकांसाठी आकर्षक.
• पुलाचे दोन्ही भाग पूर्ण झाल्यानंतर मध्यभागी १३९ कोटी रुपये खर्च करून गॅलरी व त्यात रेस्टॉरंट सुरू करण्याचा
प्रस्ताव
• गॅलरी तथा रेस्टारंटमध्ये जाण्यासाठी लिफ्टची सोय असणार आहे. तेथून सभोवतालचे विहंगम दृश्य न्याहाळण्याची व कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळणार आहे.
• पुलावर एका बाजूला वाहने उभी करून ठेवण्यासाठी वाहन पार्किंगची सोय असेल.
● पणजी ते मडगाव हा प्रवास अवघ्या २५ मिनिटाचा होईल.
• २०१६ साली नव्या झुआरी पुलाची पायाभरणी. सहा वर्षांमध्ये अनेक अडथळे घेऊनही पहिला टप्पा पूर्ण.
● दिलीप बिल्ड कॉम या कंपनीतर्फे बांधकाम.
• आज मध्यरात्री १२.३० नंतर पुल वाहतुकीसाठी खुला
करण्यात आला.
• दुसन्या टप्प्याचे काम पूर्ण होईपर्यंत पणजीहून दक्षिण गोव्यात जाणाऱ्या दुचाकी, कार व कमी वजनाची वाहने जुन्या पुलावरूनच जातील. फक्त अवजड वाहनाना नव्या पुलावरून जाण्यास मुभा

• दक्षिणेतून पणजीकडे येण्यास नव्या पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांना सूट

• पुलावर तासी ३० ते ४० कि.मी. वेग नियंत्रण, सीसीटीव्ही कॅमेरे. नियम सोडल्यास कारवाई

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news