गोवा : कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल; रेती उपशावरून गँगवारची शक्यता

गोवा : कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल; रेती उपशावरून गँगवारची शक्यता

पणजी ः पुढारी वृत्तसेवा राज्यात खून, गोळीबार आदी घटनांमुळे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप विरोधकांनी मंगळवारी केला. रेती उपशाच्या विषयावरून राज्यात गँगवार होऊ शकते, अशी भीती विरोधकांना वाटते.गृहमंत्री पद सांभाळणार्‍या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे अ‍ॅड. अमित पाटकर, खासगी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

सरदेसाई यांनी एक व्हिडीओ प्रसिद्धी माध्यमात पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात, दररोज खून होत आहेत. मृतदेह सापडत आहेत. तरी पोलिस यावर नियंत्रण आणू शकत नाहीत. कुडचडे येथे गोळीबार होतो, बायणा येथ युवकाला भोसकून ठार केले जाते. पणजीत संशयास्पद मृतदेह सापडतो. आसगाव येथील तरुण अपघाताने मेला की त्याचा खून झाला याचा छडा पोलिस लावू शकलेले नाहीत. भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा खरा खुनी कोण हे पोलिस शोधू शकले नाहीत. अशा सर्व घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकार मात्र काँग्रेसचे आमदार फोडण्यात गुंतले आहे.

स्वतंत्र गृहमंत्री नेमा ः आप

आम आदमी पक्षाचे संयोजक अ‍ॅड. अमित पालयेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गृहमंत्रिपदाला योग्य न्याय देऊ शकत नसल्यामुळे स्वतंत्र गृहमंत्री नेमण्याची मागणी केली आहे. गोव्यात खून होत आहेत, चोर्‍या होत आहेत, अमली पदार्थाचा व्यावहार वाढला आहे. मात्र पोलीस स्वस्थ बसून आहेत. पोलिसांचे भय गुन्हेगारांना नसल्यामुळेच आणि राजकीय आशीर्वादामुळेच या सर्व गैर गोष्टी घडत आहेत. मंत्री आमदारांनी पोलिसांचा वापर हप्ते गोळा करण्यासाठी न करता त्यांना स्वातंत्र्य द्यावे. अमली पदार्थाच्या व्यवहारातील खरे 'डीलर' बाजूला ठेवून लहान-लहान विक्रेत्यांना पकडले जाते.

आता रोज ड्रग्ज पकडता, आधी का नाही पकडले?

अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनीही पणजीत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पोलिस लोकांना भय दाखवतात. तक्रार नोंद करण्यासाठी पैसे मागतात, असा आरोप त्यांनी केला. पोलिस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक फक्त वेतन घेत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर अमली पदार्थ विकणार्‍यांना दररोज पकडले जाते, त्यापूर्वी का पकडले नव्हते, असा प्रश्नही त्यांनी केला. पीडीए घोटाळाप्रकरणी मायकल लोबो यांना व कला अकादमी बांधकाम घोटाळाप्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांना जरी दक्षता खात्याने क्लीन चीट दिली असली तरी या तक्रारीची चौकशी पोलिस अधीक्षकांनी करावी, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले

रेती उपसा धोरण राबवा

सरदेसाई म्हणतात, राज्यामध्ये रेती उपशासाठी योग्य धोरण नसल्यामुळे रेती बेकायदेशीरपणे काढली जाते आणि मग गोळीबार होतात. या सर्व गोष्टींना मुख्यमंत्री जबाबदार आहेत, कारण गृहमंत्रिपद आणि खाणमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, असा आरोप करून रेती-उपसा धोरण योग्य प्रकारे राबवले नाहीतर गोव्यामध्ये गँगवार होण्याची शक्यता आहे.

logo
Pudhari News
pudhari.news