कुडचडे गोळीबार प्रकरण
कुडचडे गोळीबार प्रकरण

कुडचडे गोळीबार प्रकरण : सहा दिवसांनंतरही सापडेनात मारेकरी

Published on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा कुडचडेत रेती व्यवसायातून झालेल्या गोळीबार प्रकरणाला सहा दिवस उलटून गेले आहेत. पण, अजून खाण खाते आणि बंदर कप्तान खात्याने या घटनेची दखल घेतलेली नाही. त्यांनी कुठल्याही रेती व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे दोन्ही खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनाही मारेकर्‍यांना शोधता आलेले नाही. झुआरीच्या उपनदीत रेती काढणार्‍या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी याचा तपास पूर्णत: रेंगाळला आहे.

नदीत होणार्‍या गैर व्यवहाराला बंदर व कप्तान खाते जबाबदार आहे. झुआरी नदीत रेती व्यवसाय सुरू होता, त्यावेळी बंदर व कप्तान खाते सक्रिय होते. तक्रार मिळताच नदीत रेती काढणार्‍यावर कारवाई केली जात होती. अधिकार्‍यांनी कुडतरी आणि बोरी येथील नदीतून जप्त केलेल्या रेतीच्या होड्या आणि रेती उपसा पंप आजही जुने गोवे येथील बंदर कप्तान खात्याच्या बंदरावर आढळून येतात.

नदीत कारवाई करणार्‍या बंदर खात्याला झुआरी नदीच्या त्या पट्ट्यात चाललेल्या रेती व्यवसायाची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उपनदीत शेल्डे आणि बाणसाय येथील युवकांचे गट गेली अनेक वर्षे बेसुमार रेती उपसा करीत आहेत. हल्ली त्यांनी रेती उपशासाठी पंपही लावले होते. तरीही हा व्यवसाय पोलिसांच्या नजरेतून सुटल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

1 रोजी याच व्यवसायातून झालेल्या गोळीबारात युसूफ नामक झारखंड येथील कामगाराला मृत्यू आला तर साहू नामक कामगाराला गोळ्या लागून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या घटनेला आता सहा दिवस पूर्ण झालेले आहेत. कुडचडे पोलिस आपल्या तर्‍हेने चौकशी करत असले तरीही बंदर कप्तान खाते मात्र सुस्त आहे. याविषयी कुडचडे पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांना विचारले असता खाण खात्याला पत्र करून कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रिकाम्या होडीचा पंचनामा

गोळीबार झालेल्या रात्री रेती घेऊन ती बोट येत होती. रेती सकट ती बोट सापडली असती तर त्या व्यावसायिकांवर कारवाई झाली असती. कारवाईच्या भीतीने त्यांनी ती रेती बाणसाय येथील काठाजवळ नदीतच फेकली आणि रिकामी होडी पोलिसांच्या पंचनाम्यात दाखवून स्वतःवर कारवाई होण्यापासून रोखले. ते रेती अजूनही खाण खात्याने जप्त केलेली नाही.

संशयितांच्या प्लॉटवर सुमारे 80 क्युबिक मीटर रेती साठवून ठेवण्यात आलेली आहे. शिवाय पारंपरिक रेती व्यावसायिकांनी शेल्डे येथील सुमारे 50 क्युबिक मीटर रेती साठवून ठेवली आहे. हा मालही खाण खात्याने जप्त करण्याची तसदी घेतलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news