Goa : ‘झुआरी’वर लवकरच वेधशाळा मनोरा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज भूमिपूजन, प्रकल्पाचा खर्च सुमारे 270 कोटी रुपये
zuari-bridge-observatory-tower-foundation-by-nitin-gadkari-goa
प्रस्तावित मनोर्‍याचे प्रतिकात्मक मॉडेल.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 23 मे रोजी गोव्यात नवीन झुआरी पुलावरील वेधशाळा मनोर्‍याचा भूमीपूजन समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व, नितीन गडकरी यांचे अग्रणी पाऊल आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वचनबद्ध प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.

या प्रकल्पाचा खर्च 270 कोटी इतका आहे. तो पाच वर्षांच्या कालावधीत उभारला जाणार आहे. या प्रकल्पात पॅरिसमधील आयफेल टॉवरपासून प्रेरणा घेऊन वेधशाळा मनोरे उभारले जातील. फिरते उपहारगृह आणि कलादालन यांचा अंतर्भाव करून हे एक जागतिक पर्यटन आकर्षण ठरावे, या दृष्टीने याचे आरेखन करण्यात आले असून गोव्याच्या समृद्ध पर्यटन परिचित्रामध्ये एक महत्त्वाचा टप्पा बनण्यास ते सज्ज आहे.

डीबीएफओटी (डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) म्हणजेच आरेखन, बांधणी, वित्तपुरवठा, चालवा आणि हस्तांतरित करा या प्रारूपावर अंमलात आणल्या जाणार्‍या या उपक्रमात सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. संपूर्ण बांधकामासाठी हितधारक जबाबदार असेल आणि 50 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी या सुविधेची कार्यवाही करेल. दोन पाईल कॅप फाऊंडेशनवरील पायलनमध्ये धोरणात्मकरित्या ठेवलेला प्रत्येक मनोरा 125 मीटर उंचीपर्यंत असेल, ज्यामध्ये 8.50 मीटर गुणिले 5.50 मीटर या परिमाणांचे शाफ्ट असतील.

वरील स्तरावर किमान 22.50 मीटर गुणिले 17.80 मीटर आकाराचे दोन विस्तीर्ण मजले असतील, ज्यामध्ये विहंगम चढाईसाठी कॅप्सूल लिफ्ट असतील. व्ह्यूइंग गॅलरी, कॅफेटेरिया आणि अत्याधुनिक पर्यटक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे मनोरे एक समग्र अनुभव देतील. सागरी भागांत दोन्ही बाजूला 7.50 मीटर वाहक रुंदीचा समर्पित वॉकवे पूल बांधला जाईल, ज्यामुळे पर्यटकांना सहज प्रवेश मिळेल. पुलाच्या दोन्ही टोकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, ज्यामुळे पर्यटकांना सोयीस्कर सुविधा मिळेल.

पर्यटनात होणार वाढ

या प्रकल्पामुळे गोव्यातील पर्यटनामध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच भारताची पायाभूत सुविधांवर आधारित जागतिक प्रतिमा उंचावेल. यामुळे वाहतूक आणि किरकोळ विक्री यासांरख्या संबंधित क्षेत्रांना चालना मिळून स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. शिवाय,आंतरराष्ट्रीय नकाशावर वास्तुशिल्पीय पर्यटन आणि अनुभवात्मक प्रवासासाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून गोव्याला स्थान मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news