

पणजी : चिकोळणा, मुरगाव येथे पकडलेल्या 43.20 कोटी रुपयांच्या कोकेन प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. या तस्करीतील झिम्बाब्वे येथील ‘मिस्टर डॉन’ आणि त्याच्या हस्तकाला क्राईम ब्रँचच्या पथकाने गुजरात येथून अटक करून आणले आहे. या दोघांची रवानगी सध्या कोलवाळ येथील तुरुंगात करण्यात आली आहे.
कोकेन प्रकरणातील मुख्य संशयित रेश्मा वाडेकर हिने तिच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करणार्याची माहिती दिली. त्यावरून प्रथम पैसे ट्रान्स्फर करणार्या चिराज दुधत याला आणि नंतर पैसे ट्रान्स्फर करण्याची सूचना देणार्या ‘मिस्टर डॉन’ ऊर्फ तारिरो ब्राइटमोर मंगवानाला बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या ते दोघे तुरुंगात आहेत.
क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, कोकेन प्रकरणाच्या तपासादरम्यान महिला आरोपी रेश्मा वाडेकर हिने खुलासा केला की, गुजरातमधील एका व्यक्तीने तिचे पैसे आणि विमान तिकिटे परदेशात (थायलंड) जाण्यासाठी हस्तांतरित केली होती. या माहितीवरून त्या व्यक्तीची माहिती मिळवण्यात आली आणि संशयित व्यक्तीचे स्थान अहमदाबाद, गुजरातमध्ये असल्याचे कळले. त्यावरून पोलिस निरीक्षक किशोर रामानन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गुजरातला पाठवण्यात आले आणि आरोपी चिराज रमेशभाई दुधत (वय 32, अहमदाबाद गुजरात) याला 22 एप्रिल रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
तपासादरम्यान, संशयित आरोपी चिराजने कबूल केले की, त्याने परदेशी नागरिक असलेल्या मिस्टर डॉनच्या निर्देशानुसार, रेश्माला पैसे हस्तांतरित केले होते. त्याने सांगितले की, त्याला ऑनलाईन मोबाईल अॅपद्वारे पैसे मिळाले होते. या व्यवहाराची पडताळणी केल्यावर असे दिसून आले की चिरागला झिम्बाब्वेचा नागरिक असलेल्या तारिरो ब्राइटमोर मंगवाना उर्फ ‘मिस्टर डॉन’कडून पैसे मिळाले होते. वडोदरा येथे राहणारा हा झिंबाब्वेचा नागरिक अलीकडे गुजरातमध्ये राहत होता. त्याला पोलिस निरीक्षक विकास देयेकर यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने 28 एप्रिल रोजी अटक केली. दोन्ही संशयितांना सध्या कोलवाळ कारागृहात पाठवण्यात आले आहे.
तब्बल 43.20 कोटी रुपयांचे कोकेन केवळ एक महिला परदेशातून विनाअडथळा आणते, याचा अर्थ तिचा कुणीतरी गॉडफादर आहे याची शंका क्राईम ब्रँचला होती. तिच्या चौकशीतून चिराजचे तर त्याच्या चौकशीतून मिस्टर डॉनचे नाव पुढे आले आहे. साहजिकच क्राईम ब्रँचही आता या सर्वांचा ‘आका’ कोण आहे याचा शोध घेत आहे.