

मडगाव : नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी मैत्रिणी समवेत गोव्यात आलेल्या सोशल मीडियावर व्हिडीओ टाकणार्याला जीवाचा गोवा करण्याची हौस चांगलीच अंगलट आली असती. रणवीर अलाहबादिया हा मैत्रिणीसह माजोर्डा समुद्रात अंघोळीसाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही लाटांबरोबर समुद्रात वाहून जाऊ लागले होते. मात्र, तिथेच समुद्रस्थान घेत असलेले ‘आयपीएस’ पती आणि ‘आयआरएस’ पत्नीला त्यांचा आक्रोश ऐकू आला. त्यांनी जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात जाऊन बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले.
ही घटना नाताळाच्या दिवशी घडली. राज्यात पर्यटन हंगाम तेजीत आला आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. 4 जानेवारीपर्यंत किनारपट्टी भागात पर्यटकांची गर्दी राहणार आहे. कोलवा, बाणावली, काब द राम, खोलासह माजोर्डा समुद्रकिनारा पर्यटकांनी भरून गेला आहे. नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी काही सिनेकलाकारही दाखल झाले आहेत.
रणवीर अलाहबादिया आपल्या मैत्रिणीसोबत दक्षिण गोव्यात आला आहे. 25 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तो व त्याची मैत्रीण माजोर्डा समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते. दोघेही पट्टीचे पोहणारे असल्याने पोहता पोहता बरेच आत गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. शिवाय, ओहोटीची वेळ असल्याने विरुद्ध दिशेने लाटांचा मारा सुरू होता. लाटांच्या प्रवाहाबरोबर दोघेही खोल पाण्यात खेचले गेले. मैत्रिणीला वाचवण्यासाठी रणवीर पुढे गेला. मात्र, दोघांनाही पुन्हा किनार्याकडे पोहून येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. सुट्टी साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गोव्यात आलेले ‘आयपीएस’ आणि ‘आयआरएस’ दाम्पत्य जवळच आंघोळ करीत होते. रणवीर आणि त्याची मैत्रीण बुडत असल्याचे पाहताच त्यांनी त्यांच्याकडे जात पाण्यातून बाहेर काढले.
रणवीर अलाहबादिया याने समाज माध्यमावर हा अनुभव सामाईक केला आहे. देवदूत म्हणून आलेल्या त्या दाम्पत्याने आपला जीव धोक्यात घालून आपले प्राण वाचवल्याचे त्याने म्हटले.