

चावडी : पुढारी वृत्तसेवा
शेळी-लोलये येथील चिकन विक्री केंद्रावर बुधवारी सायंकाळी तिथे काम करणारे संजय नाईक (३२) यांच्या पोटाश लोखंडी सळी खुपसून खून करण्यात आला. या प्रकरणी खुनाच्या संशयावरून एडवर्ड नामक व्यक्तीला काणकोण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
चिकन विक्री केंद्राच्या शेजारीच संशयित एडवर्ड याचे घर आहे. चिकन केंद्रात काम करणारे संजय नाईक आणि एडवर्ड यांच्यात वारंवार खटके उडत असत. बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी एडवर्ड याने संजय नाईक यांच्या पोटाश लोखंडी सळी खुपसून त्यांचा खून केल्याचे चिकन विक्री केंद्राचे मालक शेखर नाईक यांनी जबाबीत म्हटले आहे.
शेखर नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एडवर्ड हा गेल्या तीन वर्षांपासून चिकन विक्री केंद्राचे मालक आणि संजय नाईक यांना शिवीगाळ करीत होता. यासंदर्भात अनेकदा पोलिस स्थानकात तक्रारी करण्यात आल्या होत्या.
मात्र, हे प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांनी हाताळायचे असल्याचे सांगून पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी या प्रकरणाची योग्य दखल न घेतल्याने अखेर खुनाची घटना घडल्याचा आरोप शेखर नाईक यांनी केला.
खुनानंतर संशयित एडवर्ड आपल्या घरात लपून बसला होता. त्याच्या घराशेजारी स्थानिकांची गर्दी जमली होती. एडवर्डला जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी नागरिक करीत होते. परिस्थिती लक्षात घेऊन काणकोण पोलिसांनी केपे आणि कुंकळी येथूनही पोलिसांची कुमक बोलावली.