

पणजी : पर्वरी येथे कदंब डेपोनजीक असलेल्या राष्ट्रोळी महारुद्र मंदिराजवळ रविवारी सकाळी टेम्पोच्या धडकेत युवक जागीच ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदंब डेपोकडून मंदिराच्या दिशेने येणार्या टेम्पोने आपल्या लेनमधून दुसर्या लेनमध्ये प्रवेश केला. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व टेम्पोची धडक मंदिराबाहेर बाकावर बसलेल्या उमेश मुट्टागी (वय 35, सुकूर) याला बसली. यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर टेम्पो उलटला. टेम्पोची धडक बसून दोन दुचाकींचेही नुकसान झाले.
पोलिसांना पाचारण केल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवला. या घटनेचा पुढील तपास पर्वरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.