

पेडणे : हसापूर येथे दुचाकी आणि ट्रक यांच्यात रविवारी रात्री 8.30 वा. अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी सर्वेश सगुण मळीक (24वर्षे, रा. हसापूर) याचा इस्पितळात नेताना मृत्यू झाला.
दुचाकीवर मागे बसलेला संदेश राणे हा युवक जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहेत. मोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सर्वेश हा दुचाकीने (जीए 11 जे 4136) मित्र संदेश राणेसह जात असता हसापूर येथे त्यांच्यासमोरील ट्रकला (जीए 03 टी 2316) या ट्रकला मागून दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेने कासारवर्णे येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. नंतर गोमेकॉत नेत असताना वाटेतच सर्वेश मळीक या युवकाचे निधन झाले. सर्वेश हा मोप विमानतळावर कामाला होता. सर्वेश हा मनमिळावू स्वभावाचा होता. अपघाताचे वृत्त पसरताच परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
सर्वेशच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. एका बहिणीचा विवाह ठरला होता. आई-वडिलांचा सर्वेश हा एकुलता मुलगा होता. स्व. स्वातंत्र्यसैनिक बाबू नाना माळी यांचा तो नातू होता. मोप पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. सोमवारी सायंकाळी स्थानिक समशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.