

मडगाव : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी रंगवून पहाटे घरी निघालेल्या युवकाने घर समजून मिठाईच्या दुकानात आपली कार घुसवली. हा प्रकार कुडचडे बाजारपेठेत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडचडे येथील काही युवकांचा गट मित्राने आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. उघड्या माळरानावर या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा केक कापून झाल्यानंतर पहाटे चारपर्यंत त्यांची पार्टी चालली. यात ते इतके धुंद झाले होते की, त्यांना स्वतःच्या पायावरही नीट उभे रहाता येत नव्हते. सदरच्या युवकाने आपली कार बाहेर काढली व सुसाट वेगाने तो शेल्डे येथील त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला. आपले घर आल्याचे समजून त्याने कार थेट मिठाईच्या दुकानाकडे घुसवली. या दुकानाच्या शटरला आदळून कार रस्त्यावर उलटली. यात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक वाचला. त्याच्यावर कुडचडे आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्या युवकाने आपली उपजीविका चालवण्यासाठी ही कार भाडेपट्टीवर घेतली होती.