

पणजी : साखळी पर्ये-सत्तरी येथील ग्रीन व्हॅली रेस्टॉरंटजवळ, शुक्रवारी मध्यरात्री 2.20 वाजता एका 27 वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमी युवक अनिकेत सिंगबाळ (27, रा. हाऊसिंग बोर्ड, साखळी) याच्यावर तत्काळ साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच साखळी परिसरात रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस निरीक्षक विजय राणे यांनी पोलिस हवालदार नीलेश फोगेरी, कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर व शैलेश धवणे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर केवळ 30 मिनिटांत पोलिसांनी योगेश सुभाष राणे (27, रा. देऊळवाडा, विठ्ठलापूर, कारापूर, डिचोली) याला अटक केली. वाहन रस्त्यावर पार्क केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. याचे पर्यवसान झटापटीत झाले आणि नंतर हा हल्ला घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.