तरुणाचे अवयवदान, पाच जणांना जीवदान : मंत्री विश्वजित राणे

पतीच्या निधनानंतर पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
Young man's organ donation saves five lives
बांबोळी ः अवयवदान करणार्‍या महिलेचा सन्मान करताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : म्हापसा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जबर जखमी होऊन कोमात गेलेल्या व ब्रेन डेथ झालेल्या मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका युवकाचे अवयवदान करण्याचा निर्णय त्याच्या पत्नीने घेतल्याने पाच व्यक्तींना जीवनदान मिळाले. मंगळवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याबाबत माहिती दिली.

मंत्री राणे म्हणाले की, आपल्या पतीचा ब्रेन डेथ झाल्यानंतर त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेल्या महिलेचा राणे यांनी सन्मान केला. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर डॉक्टर उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे म्हणाले की, 25 वर्षीय तरुणाने अवयवदान करून तो हिरो झालेला आहे. त्याच्यामुळे 5 जणांना जीवनदान मिळाले आहे. म्हापसा येथे अपघात झाल्यानंतर मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला वाचवता आले नाही आणि त्याचा मेंदू मृत घोषित करण्यात आला. अवयवदान करणारा हा दाता डिचोली येथील बांधकाम साईटवर कामगार होता. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि तीन मुले आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली.

मेंदूच्या स्टेम डेथ सर्टिफिकेटचे काम जीएमसीच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. टेरेसा फरेरा आणि जीएमसीच्या औषध विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. रुक्मा कोलवलकर यांनी केले. राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या 35 वर्षांच्या आणि 36 वर्षांच्या अशा दोन महिलांना मृत दात्याच्या किडणी तथा मूत्रपिंडाचे वाटप केले. तसेच मुंबई येथील 55 वर्षांच्या पुरुषाला व अहमदाबाद येथील 39 वर्षांच्या पुरुषाला यकृत रोटो वेस्ट दिले. फुफ्फुसांसाठी योग्य प्राप्तकर्ता नसल्याने ते एनओटीटीओला देण्यात आले आणि दिल्लीतील अपोलो रुग्णालयाला वाटप करण्यात आले, अशी माहिती डीन डॉ. बांदेकर यांनी दिली.

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर यांनी अवयवदात्याचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी जबलपूर, मध्य प्रदेश येथे पोहोचवण्याचे कुटुंबाला आश्वासन दिले. अवयवदान यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय समुदाय, प्रशासकीय विभाग, वाहतूक विभाग, गोवा पोलिस, विमानतळ प्राधिकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवयवदानाला हो म्हणणार्‍या दात्या कुटुंबाच्या उदारतेचा समावेश असलेल्या प्रत्येक भागधारकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अवयवदानाच्या या निःस्वार्थ कृतीमुळे 5 कुटुंबांना नवीन आशा मिळाली, असे डॉ. बांदेकर म्हणाले.

ग्रीन कॉरिडॉर

अवयव प्रत्यारोपणाच्या यशासाठी दान केलेल्या अवयवांना प्राप्तकर्त्याच्या रुग्णालयात लवकर पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोट्टो गोवा, ईएमआरआय 108, गोवा पोलिस वाहतूक विभाग आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे गोमेकॉपासून दोन्ही विमानतळांपर्यंत तीन ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. ज्यामुळे अवयवांची वाहतूक सुरळीत आणि वेळेवर होईल याची खात्री झाली. विमानतळ अधिकार्‍यांनी अवयव वाहून नेणार्‍या पथकांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news