गोव्यात वर्षाला ३ हजार मराठी नाटकांचे रंगभूमीवर सादरीकरण, जाणून घ्या इथली समृद्ध नाट्यपरंपरा

World Theatre Day 2025 | गोमंतकीय रंगभूमी मराठी नाटकाच्या पायावरच उभी
World Theatre Day 2025
जागतिक रंगभूमी दिन - गोव्याची नाट्य परंपरा(Pudhari)
Published on
Updated on
पणजी : विठ्ठल नागेश गावडे (पारवाडकर)

World Theatre Day 2025 | जागतिक रंगभूमी दिन : गोमंत रंगभूमीच्या प्रारंभाबाबत विविध मते आहेत. काही संशोधकांच्या मते, गोमंतक रंगभूमीचा काळ 1843 पूर्व आहे. काहींच्या मते 17 व्या शतकात, काहींच्या मते 16 व्या शतकात, तर काहींच्या मते 12 व्या शतकात गोमंत रंगभूमी सुरू झाली होती. ब्रिटीश सत्ता काळात अण्णासाहेब किर्लोस्कर हे सरकारच्या मिठाच्या खात्यात (सॉल्ट रेंज) सेवेत होते. त्यावेळी मिठावरील जकातीचे काम मुंबई सरकारकडे होते.

1880 मध्ये ते क्रॉफर्ड साहेबांसोबत शासकीय कामानिमित्त गोव्यात आले होते. त्यावेळी डोंगरी (तिसवाडी) येथे श्री रामनवमी उत्सवात, आद्य गोमंतकीय नाटककार व कवी कृष्णंभट बांदकर यांनी लिहून सादर केलेल्या ’शुक रंभा संवाद’ या पुराण कथेवर आधारित नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला. हा नाट्यप्रयोग पाहून ते भारावून गेले. या प्रेरणेतून अण्णासाहेबांनी संगीत ’शाकुंतल’ हे नाटक लिहायला घेतले. त्यांच्या ’शाकुंतल’ नाटकाचा पहिला प्रयोग 31 ऑक्टोबर 1880 रोजी पुण्यात झाल्याची नोंद आहे. तोच गोव्यातील नाटकाचा पहिला प्रयोग असे अनेक नाट्य समीक्षक म्हणतात. मात्र, ज्या नाटकाची प्रेरणा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी घेतली, त्या नाटकाचा पहिला प्रयोग त्या आधी रामनवमीला म्हणजे 1880 साली मार्च/एप्रिल महिन्याच्या दरम्यान गोव्यात तिसवाडीत डोंगरी येथे झाल्याची अनेक पुस्तकांत नोंद आढळते. त्यामुळे नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा मान गोव्याला आहे. त्यासाठी आद्य गोमंतकीय नाटककार व कवी कृष्णंभट बांदकर यांना प्रत्येक रंगकर्मीने आदराने मानाचा मुजरा केला पाहिजे. कारण त्या काळात त्यांनी केलेला नाट्य लेखनाचा विचार आणि अत्यल्प सुविधांतही उभ्या केलेल्या प्रयोगांना खरीच दाद दिली पाहिजे.

गोंयकारांना सुशेगाद म्हणून संबोधले जाते. पण 'सुशेगाद' असला तरी गोंयकार सुस्त कधीच नव्हता हे मान्य करावेच लागेल. आता तर सुशेगादपणाची कात टाकून गोंयकार वेगाने पावले टाकीत, आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होत आहेत. गोंयकार कमालीचा हट्टी आणि श्रद्धाळू आहे. एखादी गोष्ट करायचीच असे मनाशी ठरवले की, आपल्या जीवाची पर्वा न करता गोंयकार त्या कार्यात स्वतःला झोकून देतो आणि यशस्वीही होतो. त्यामुळेच गोमंतकीय अनेक कलाकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.

नाटक आणि तियात्र हे नाट्याचेच दोन्ही प्रकार गोव्यातच पाहायला मिळतात

नाटक आणि तियात्र हे नाट्याचेच दोन्ही प्रकार पहायला मिळणारा भारतातील एकमेव प्रदेश म्हणून गोव्याचे नाव घ्यावे लागेल. रघुवीर नमशीकर, रघुवीर सावकार, श्रीपादराव नेवरेकर, मा. दीनानाथ मंगेशकर, मा. दत्ताराम वळवईकर, प्रभाकर पणशीकर, हिराबाई बेडोदेकर, ज्योत्स्नाबाई भोळे, गिरिजाताई केळेकर आदी बुजूर्ग नाटक कलाकारांनी गोव्याची रंगभूमी समृद्ध केली. हिराबाई पेडणेकर या पहिल्या गोमंतकीय महिला नाट्यलेखक. हौशी रंगभूमीसाठी सुमारे 55 नाटके लिहिणारे रमाकांत पायाजी हे एक यशस्वी नाट्यलेखक म्हणता येतील.

गोमंतकीय रंगभूमी मराठी नाटकाच्या पायावरच उभी

गोमंतकीय नाटकांचा विचार करता मराठी व कोकणी नाटके आणि तियात्र रंगभूमी ही मराठी नाटकाच्या पायावरच उभी आहेत. असे तीनही प्रकारातील नाट्यकर्मीचे प्रांजळ मत आहे. गोमंतकीयांचे नाट्यप्रेम संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच तोंडाला रंग न फासलेला गोमंतकीय मिळू शकणार नाही, असे म्हटले जाते. पूर्वी वाड्या-वाड्यावर मिळून गोव्यात वर्षभरात किमान पाच ते सहा हजार नाटके सादर होत होती. आता हळूहळू गावातील तरुण शहराकडे स्थलांतरित होऊ लागल्यामुळे व नाटकाच्या तालमीसाठी युवक उत्साह दाखवत नसल्यामुळे तसेच स्त्री कलाकार उपलब्ध न होणे आदी काही कारणांमुळे गावातील मराठी नाटके कमी झाली आहेत.

नाट्यवेडे गोमंतकीय दर्जेदार नाटकांना नेहमीच गर्दी करतात. मग ते नाटक स्थानिक कलाकारांचे असो वा परराज्यातून आलेल्या नामवंत कलाकारांचे. त्यामुळे नाटक, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात उज्ज्वल परंपरा लाभलेल्या गोमंतकात सध्याच्या काळात वर्षाकाठी ३ हजारांच्या आसपास मराठी नाटके हौशी रंगभूमीवर सादर होतात. यापूर्वी हा आकडा ४ ते ६ हजारांच्या आसपास होता. मध्यंतरीच्या काळात युवा वर्ग ऑर्केस्ट्राकडे आकर्षित झाल्यामुळे अनेक गावांत मराठी नाटकांच्या जागी ऑर्केस्ट्रा सादर होऊ लागले. आता ही जागा विनोदी कोकणी नाटकांनी घेतली आहे.

मोर्ले सत्तरी येथील नाट्य व गायक कलाकार विठ्ठल गावस यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली स्वर सत्तरी संस्था सध्या संगीत नाटकात प्रथमस्थानी आहे. गतवर्षी दिल्ली येथे झालेल्या संगीत व गद्य मराठी नाट्यस्पर्धेत गोव्यातील नाटकांनी महाराष्ट्रातील नाटकांना मागे टाकत अनेक बक्षीसे पटकावली. यावरून गोव्यात नाट्यसंस्कृती किती रुजली आहे याची प्रचिती येते. यावर्षी ही रुद्रेश्वर पणजी या संस्थेने अ. भा. मराठी हौशी नाट्यस्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

गोव्यात हौशी नाटकांना पुन्हा चांगले दिवस येणार

आजचे कोकणी नाटक हे मराठी नाटकांच्या पायावरच उभे आहे, असे मत प्रसिद्ध नाटककार पुंडलिक नाईक यांनी काही वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. त्यामुळे गोव्यातील मराठी रंगभूमीची परंपरा फार फार मोठी आहे याची प्रचिती येते. मात्र 20 वर्षांपूर्वी गोव्यात ज्या प्रमाणात हौशी नाटके सादर होत होती व त्यांचे गोव्यातील विविध भागांतच नव्हे तर राज्याबाहेरही प्रयोग होत होते ते आता होताना दिसत नाहीत. याची कारणे शोधण्याची मात्र निश्चित गरज आहे. त्यातच कला अकादमीचे अध्यक्ष तथा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी गतवर्षी सुरू केलेल्या ’व्हिलेज थिएटर’ या योजनेमुळे गावागावांतील नाटकांना अर्थसाहाय्य प्राप्त होणार असल्यामुळे राज्यात हौशी नाटकांना पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

...तेव्हाच नाटकाचा खरा कस लागतो

एखाद्या सर्जनशील साहित्यकाराच्या लेखणीतून उतरलेले नाटक, दिग्दर्शकाचे कसब आणि कलाकारांचा अभिनय यांच्याद्वारे हजारो प्रेक्षकांसमोर सादर होते. तेव्हाच त्या नाटकाचा खरा कस लागतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती संहिता, कथा, कविता, कादंबरीसारख्या साहित्य प्रकाराचे मोजमाप ठरविताना आपण वाचकालाही एक महत्त्वाचा घटक मानतो. नाटकाची उंची, खोली पारखण्यास प्रेक्षकांची मते जाणून घेऊन त्यांना काय हवे यांचा विचार करुन नाटके सादर व्हायला हवीत.

दशावतार, काल्पनिक, पौराणिक नाट्य परंपरेचा पाया भक्कम

दीडशे वर्षांपूर्वी गोव्यात नाट्य कलेची परंपरा अविरतपणे प्रवाहित राहण्यासाठी अनेक हौशी नाट्य कलाकारांनी आणि नाट्य संस्थांनी मोठे योगदान दिले आहे. ज्या काळात नाटक करण्यासाठी हव्या असलेल्या तंत्राची कोणत्याही प्रकारची सोय अपेक्षित करणे म्हणजे मूर्खपणाच. अशा काळात अनेक हौशी नाट्य कलाकारांनी रंगभूमी आपल्यातील कलेच्या रंगांनी सजवली, नटवली. पदरात शिक्षण एकदमच मोजके. जे शिक्षण होते ते तोंडी. रामायण, महाभारत आणि कुणाकडून तरी ऐकिवात असलेल्या कथानकावरून नाटक उभे करणे म्हणजे तारेवरची कसरत. अशा परिस्थितीत नाटक करणे ही गोष्टच कल्पनेच्या पलिकडची. असे असतानाही त्या काळात या ध्येयवेड्या उत्तुंग कलाकारांनी ही नाट्य परंपरा कशी जपली असेल? असा मोठा प्रश्न उभा होतो. पण जपली हे सत्य. आज गोव्यात दशावतार, काल्पनिक, पौराणिक अथवा सामाजिक नाट्य परंपरेचा पाया भरभक्कम आहे, याचे श्रेय तत्कालीन अनेक हौशी नाट्य कलाकारांना आणि त्याकाळच्या नाट्य संस्थांनाच द्यावे लागेल. खरे तर दरेक कलाकार ही एक नाट्य संस्थाच होती.

आज ज्याप्रमाणे फुगडी, डान्स, आर्केस्ट्रा, दांडिया, अनेक स्पर्धा अथवा क्लब आणि मंडळांसाठी अनेक प्रवाहातून पैसा दान स्वरूपात दिला जातो. त्याप्रकारचे कसलेही सहकार्य व दानाची अपेक्षा त्यावेळी नव्हतीच मुळी. तरीही त्याकाळी नाटक रंगले. नाट्य रंगभूमी रंगली. तत्कालीन नाट्य कलाकारांनी ती रंगवली, प्रवाहित ठेवली. जेव्हा सत्तरीतल्या नाट्य परंपरेविषयी तत्कालीन नाट्य कलाकारांची, कला अनुभवलेल्या रसिकांची भेट घेतली व त्यांचा अनुभव ऐकला तेव्हा त्या कलाकारांसमोर हात जोडावे अशी भावना निर्माण झाली. खरंच ते फक्त कलाकार नव्हेत. कला म्हणजे जीवन. कला म्हणजे जीवनाचे व्रत. कला म्हणजे जीवनाचे सार्थक. कला हेच ध्येय. त्यांचे नाट्य कलेशी श्वासाचे नाते होते. काही कलाकार तर फक्त प्रसादाचा द्रोण घेऊन नाटके करायचे. सध्याच्या काळात एकेका नाटकाची व कलाकाराची बिदागी ऐकून पूर्वीच्या नाट्यकलाकारांच्या कलेप्रती असलेल्या त्यागाला वंदन करावेसे वाटते.

म्हणून नाट्य परंपरा जपली...

गोव्यात अनेक नाट्य संस्था होत्या आणि आजही आहेत. या नाट्य संस्था खेडोपाड्यात जाऊन नाटके करायच्या. या नाट्य संस्थेमध्ये कलाकारांची भूमिका करणार्‍या अनेक कलाकारांचे नातेवाईक आजही मोठ्या अभिमानाने त्यांचे किस्से सांगतात. त्यावेळी तज्ज्ञ दिग्दर्शक नाही. झगझगीत भरजरी कपडे उपलब्ध असणारे नाट्यालंकार दुकान नाही. रंगभूषाकार नाही. नेपथ्यकार नाही. वीज नाही. ध्वनीमुद्रण नाही. आजच्यासारखे कला अकादमी अथवा रवींद्र भवन सारखी सुविधा नाही. फक्त एकच गोष्ट या खेडेगावातील कलाकरांपाशी होती ती म्हणजे जिद्द. नाट्य कला जपली पाहिजे. तिचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. तिचा आस्वाद आमच्या रसिकांना कष्टकरी लोकांना लाभला पाहिजे. या हेतूने ही नाट्य परंपरा जपली गेली.

गावागावातून नाट्य रसिकांची गर्दी व्हायची

दशावतारी नाट्य संस्थेतील कलाकार अनेक जागी त्या काळी पायी चालत जात नाटक परंपरा जगवली. डोक्यावर आपले सामान, दहा ते वीस किमी अंतर पायी चालत डोक्यावर सामानाची पेटी घेऊन नाटक करणे हा विचारच थक्क करणारा आहे. नाटक हा त्यांचा त्यावेळी व्यवसाय नव्हता. या नाट्य संस्थेतील सगळेच्या सगळे कलाकार आपल्या शेतात काबाडकष्ट करणारेच होते. दिवसा कष्ट आणि रात्री नाटक. नाटक फक्त आनंदासाठी. बिदागी ही एकदमच अल्प. रुपयाच्या घरात अशीच. तरीही त्याकाळी या कलाकारांनी रंगभूमी जगवली.

नदीतील वेगवेगळ्या दगडांचेच रंग, राख याचा वापर त्याकाळी तोंड रंगवण्यासाठी व्हायचा. नाटक हे या कलाकारांसाठी व्यवसाय नसून तो छंद होता. या नाट्य मंडळाच्या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी गावागावातून नाट्यवेड्यांची गर्दी व्हायची. पूर्वी नाटक हेच कमेव मनोरंजनाचे साधन होते. गावात वर्षाला होणारी चार दोन नाटके हिच मनोरंजनची साधणे होती. त्यामुळे रसिक प्रेक्षकही नाटकाचा भुकेला होता. नाटक सुरू झाले की ते संपेपर्यंत न हलणारा प्रेक्षक होता.

दशावतारी, काल्पनिक, ऐतिहासिक, पौराणिक अथवा सामाजिक नाटकांचे स्वरूप आजच्या मानाने तसे फारच वेगळे पण दीडशे वर्षापूर्वी लावलेल्या नाट्य परंपरेच्या वटवृक्षाने जमिनीत रुजविलेल्या पारंब्या आज घट्ट आणि मजबूत झाल्या आहेत. सरकारी कला व संस्कृती खात्याने हौशी नाटक अनुदान योजना सुरू केली आहे. सरकार नाटकाचा खर्च देत आहे. त्यामुळे गावातील. नाटके पुन्हा सुरू होत आहेत.

नाटकांचा विचार करता कला अकादमीची ‘अ’ व ‘ब’ नाट्यस्पर्धा वगळता अन्य मोठी राज्यस्तरीय स्पर्धा गद्य नाटकांसाठी गोव्यात होत नाही. कला अकादमीतर्फे एकांकिका स्पर्धा घेतली जाते. राजीव कला मंदिर फोंडातर्फे घेतल्या जाणार्‍या ऐतिहासिक व महिला संगीत नाट्य स्पर्धा, कला अकादमीचा संगीत नाटक महोत्सव यामुळे राज्यात मराठी संगीत नाटकांची संख्या वाढत आहे. संगीत नाटकांना असणारी मागणी पाहता राज्यात संगीत नाटकांचे पर्व आल्याचा भास जाणवतो.

कला अकादमी पणजी, साखळी, मडगाव, कुडचडे व वास्को येथील रवींद्र भवन, राजीव कला मंदिर फोंडा ही सरकारी नाट्यगृहे गोव्यातील कलाकारांच्या कलागुणांना उत्तेजन देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news