

पणजी: काव्या कोळस्कर
ऑफिसमधील कामाचा ताण संपतो, पण वर्किंग वूमनचा दिवस संपत नाही. घरी परतल्यानंतर घरकाम, मुलांची जबाबदारी, कुटुंबाची काळजी आणि पुढील दिवसाची तयारी अशी दुसरी 'शिफ्ट' सुरू होते. करिअरमध्ये पुढे जाण्याची धडपड आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आरोग्याला आणि विशेषतः मानसिक आरोग्याला दुय्यम स्थान देण्याची वेळ अनेक महिलांवर येत आहे. परिणामी, सततचा ताण, झोपेचा अभाव, थकवा, चिंता आणि स्वतःसाठी वेळ मिळणे हे महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत आहे.
१० ऑक्टोबरच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या 'वेळ वापर सर्वेक्षण २०२४' नुसार, १५ ते ५९ वयोगटातील ४१ टक्के महिलांचा घरातील सदस्यांची काळजी घेण्यात सहभाग आहे. मात्र, पुरुषांमध्ये हे प्रमाण २१.४ टक्केच आहे.
याच सर्वेक्षणानुसार, १५ ते ५९ वयोगटांतील महिलांनी विनामोबदला घरगुती कामांवर दिवसाला सरासरी ३०५ मिनिटे, तर पुरुषांनी ९३ मिनिटे खर्च केली. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कामाचा दिवस कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही सुरूच राहतो, हे आकडे स्पष्ट करतात.
वर्किंग मदर' समोर दुहेरी दबाव
' मुलाच्या जन्मानंतर महिलांसमोर करिअर आणि मातृत्व यांचा समतोल साथण्याचे आव्हान अधिक तीव्र होते. बाळाची काळजी, स्तनपान, झोपेचा अभाव, प्रसूतीनंतरचे शारीरिक बदल आणि घरातील जबाबदाऱ्या यासोबतव नोकरीतील कामगिरी टिकवण्याच्या वाढत्या दबावामुळे अनेक महिला डिप्रेशनच्या शिकार बनत आहेत.
बदलती जीवनशैली, मानसिक आरोग्य
अनियमित वेळा, सतत स्क्रीनवर राहणे, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, सोशल मीडियावरील 'परफेक्ट लाइफ'ची तुलना यामुळे मानसिक ताण वाढण्याची शक्यता असते. महिलांकडून घर आणि कार्यालय दोन्हीकडे 'परफेक्ट' कामगिरीची अपेक्षा असल्याने नकळतपणे त्यांच्यावरील तणावही वाढत चालला आहे. तणावाची कोणतीही लक्षणे दीर्घकाळ जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे या जागतिक मानसिक दिनानिमित्त अधोरेखित केले जात आहे
समतोल आवश्यक
महिलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी जबाबदाऱ्यांचे समान वाटप हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. घरकाम आणि बालसंगोपन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पती-पत्नीची समान जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज आहे. कार्यालयांमध्ये लवचिक कामाचे तास, मातृत्वानंतर कामावर परतण्यासाठी अनुकूल वातावरण, गरजेनुसार धरून काम करण्याची सुविधा आणि अनावश्यक कामाचा ताण कमी करणारी धोरणे यामध्ये प्रभावी ठरू शकतात.
मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी महिलांनी स्वतःला स्वीकारून स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देत नियमित आरोग्य तपासण्या, पुरेशी झोप, योग्य आहार, व्यायाम आणि छंद जोपासले पाहिजेत. प्रत्येक जबाबदारी स्वतःच स्वीकारण्याऐवजी गरजेनुसार मदत मागणे आणि 'नाही' म्हणणेही गरजेचे आहे. घरच्या मंडळींनी देखील वर्किंग वुमन्सना मदतीचा हात दिला पाहिजे.
- मानसी कोपरे, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक, डिचोली