पणजी : चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढलेले मोबाईल स्क्रीन टायमिंग, निद्रानाश यामुळे पूर्वी ६०- ७० वयानंतर दिसून येणाऱ्या हृदयरोगाचे निदान आता २५ ते ३०- २५ वयोगटातील तरुणाईमध्ये दिसून येत आहे.
राज्यात एका अर्थाने नवी पिढी हृदयरोगाच्या विळक्यात अडकताना दिसत आहे, अशी माहिती राज्यातील हृदयरोग तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याकरिता आहार-विहार व दिनक्रमात बदल करणे अत्यावश्यक बनल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. ज्योती कुस्नुर, डॉ. महादेव पोकळे, डॉ. सव्यसाची मुखोपाध्याय या तज्ज्ञांनी या रोगासंदर्भातील गंभीर परिस्थिती कथन केली. मणिपाल रुग्णालयाच्या हृदयरोग विभागप्रमुख डॉ. ज्योती कुस्नुर म्हणाल्या, अलीकडच्या काळात युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी साधारणपणे ६० ते ७० वर्षांनंतर हृदयरोग झाल्याचे किंवा होत असल्याचे निदान होत असे; पण आजची स्थिती वेगळी आहे. आज २५ ते ३० वर्षे वयोगटात हृदयरोग दिसत आहे. ४० ते ४५ वर्षे वयोगटात हृदयविकाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या क्रांतिकारी बदलांमुळे हृदयरोगातील बदलांसाठी अत्याधुनिक औषध प्रणाली उपलब्ध होत आहे.
आज 'बायपास 'सारख्या 'ओपन हार्ट सर्जरी' करण्याची गरज नाही. यासाठी आधुनिक 'ब्लड थीनर', नवीन पद्धतीचे 'इलेक्ट्रिक लीड' उपलब्ध झाले असून, ते सहज वापरता येण्याजोगे आहेत. पूर्वी किडणी रोगाच्या संदर्भात वापरल्या जाणारी लुथोट्रिप्सी शस्त्रक्रिया पद्धत आता हृदयरोगांमध्येही वापरली जात असून, ओपन हार्ट शस्त्रक्रियांना हा चांगला पर्याय आता उपलब्ध झाला आहे. अनेक औषधांना आता 'साईड इफेक्ट्स' नाहीत, त्यामुळे या नव्या औषध प्रणालीचाही हृदयरोग रुग्णांनी उपयोग करून घेतला पाहिजे, असेही डॉ. ज्योती कुस्नुर म्हणाल्या. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. महादेव पोकळे यांनी सांगितले, पूर्वी वार्धक्यात एखाद्या शिरेमध्ये गाठी (क्लॉट) दिसून येत होते. आज तरुणाईत शिरांमध्ये गाठी दिसून येणे सामान्य बाब बनली आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की हृदयरोग हा जीवनशैलीशी निगडित आहे. योग्य काळजी घेतली आणि वेळेत उपचार मिळाल्यास त्यावर ९९.९९ टक्के नियंत्रण मिळवता येते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. प्रामुख्याने अयोग्य आहार, जंकफूडचा मोठ्या प्रमाणात वापर, पिझ्झा, बर्गर, तेल आणि फॅटयुक्त मांसाहार, तिखट व तळलेल्या पदार्थांचा वापर, व्यायामाचा अभाव ही हृदरोगाला निमंत्रण देणारी काही प्रमुख कारणे आहेत. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेतल्यास या रोगापासून दूर राहता येते.