

पणजी : अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील कामगारांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, तरीही केंद्र आणि राज्य सरकारांच्या कामगारविरोधी आणि शेतकरीविरोधी धोरणांमुळे कामगारांवर अन्याय होत आहे. हा आमचा लढा एक दिवसापुरता नसून जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर सुरूच राहणार असून लवकरच ‘गोवा बंद’ची हाक देऊ, असा इशारा आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला.
केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी दिलेल्या देशव्यापी आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी पणजीतील आझाद मैदान येथे अखिल भारतीय कामगार संघटनेच्या (आयटक) नेतृत्वाखाली राज्यातील अन्य संघटनांनी निषेध सभेत भाग घेतला. यावेळी अंगणवाडी सेविका, कृषी, विमा कर्मचारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी देखील या आंदोलनांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी सुहास नाईक, प्रसन्न उटगी, राजू मंगेशकर आणि इतर संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.
राजू मंगेशकर म्हणाले की, वारंवार पाठपुरावा करूनही सरकार कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते. सरकारतर्फे कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लवकरच आम्ही रस्त्यावर उतरू.