

पणजी : गोव्यातील उद्योगांना आता रात्रीच्यावेळी, संध्याकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत कारखान्यांमध्ये महिला कर्मचार्यांना कामावर ठेवण्याची मुभा आहे, राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिली आहे. सरकारने गुरुवारी कारखाने कायदा, 1948 च्या कलम 66 च्या कलम (ब) उप-कलम (1) मध्ये सुधारणा केली, ज्यामुळे कंपन्यांना रात्रपाळीत महिलांना ठेवण्यासाठी यापुढे विशेष परवानग्यांची आवश्यकता भासणार नाही.
रात्रपाळीत कारखान्यांमध्ये महिलांना कामावर ठेवण्याचा निर्णय तत्काळ अंमलात येणार आहे. हा सुधारित कायदा कारखाना कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व कारखान्यांना लागू आहे. तथापि, ही परवानगी महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अटींच्या अधीन आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत काम करणे संबंधित महिला कामगाराच्या लेखी संमतीनेच करावे लागेल. शिवाय कामगारांना घेऊन जाण्यासाठी आणि आणण्यासाठी पुरेशी सुरक्षा आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याशिवाय, महिला कामगार ज्या कामाच्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि निरोगी काम करण्याची परिस्थिती देणे आवश्यक आहे, असे कायद्यात म्हटले आहे.
राज्यात सुमारे 8000 नोंदणीकृत उद्योग आहेत आणि त्यांना आता महिला कामगारांना रात्रीच्यावेळी कामावर ठेवण्यासाठी सरकारी परवानगीची आवश्यकता नाही. काही उद्योेगांनी सरकारकडे रात्रपाळीत महिलांना कामावर ठेवण्याची परवानगी मागितली होती. त्याला अनुसरून कायदा बदलण्यात आला आहे.
रात्रपाळीला जे उद्योग महिलांना कामावर ठेवतील, त्यांच्याकडील सुविधांची पाहणी सरकारी पथक करणार असून त्यानंतरच परवानगी मिळणार आहे.