

वाळपई : गोव्यामध्ये आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यात येत असतानाच होंडा सालेली भागांत चोरट्याने एका महिलेवर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ला करून घरातील लाखो रुपयांचा ऐवज लाटण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या हल्ल्यात वैशाली पेडणेकर ही महिला जखमी झाली आहे. त्यांच्या घरातून सुमारे अडीच लाखांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी पळून नेल्याची तक्रार होंडा येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अजूनपर्यंत संशयिताचा पत्ता लागलेला नाही. वाळपई पोलिस संशयिताच्या शोधात आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सालेली येथे आठ दिवसांपूर्वी गृहप्रवेश करून राहायला आलेल्या साईनाथ पेडणेकर यांच्या घरात घुसून दोन चोरट्यांनी त्यांच्या पत्नी वैशाली पेडणेकर यांच्यावर चाकूचा वार करून मंगळसूत्र तसेच आणखीन सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या विषयी वैशाली पेडणेकर यांनी सांगितले की रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान तोंडावर मास्क घालून समोरच्या दाराने दोन व्यक्ती येताना दिसल्या, त्याचक्षणी हे दृष्य पाहिल्यानंतर वैशाली पेडणेकर हिने आपल्या दोन लहान मुलांना एका खोलीत बंद करून घराचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेऊन दरवाजा उघडला व घरात प्रवेश केला आणि तिच्या हातावर चाकूचा वार केला व तिला जखमी करून कपाटात ठेवलेल्या मंगळसूत्रासह बर्याच किमतीच्या वस्तू घेऊन मागच्या दाराने पळ काढला. हे चोर कोकणी भाषेत बोलत होते, असे वैशाली पेडणेकर हिने सांगितले.
घटनेची माहिती रात्रपाळीवर कामावर गेलेले तिचे पती साईनाथ पेडणेकर यांना मिळताच त्यांनी तातडीने होंडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन सविस्तर घटना सांगितली. त्याप्रमाणे वाळपई पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची यंत्रणा सुरू केली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व श्वानपथक आणून पाहणी करण्यात आली. श्वानपथक घराच्या पाठीमागे जाऊन घुटमळत राहिले, पाऊस खूप पडत असल्याने चोरट्यांचा माग मिळू शकला नाही.