Goa News : गोविंद गावडे यांच्या जागी कोण?

राजकीय चर्चांना ऊत; आणखी काहींची मंत्रिपदे जाण्याची शक्यता
who-will-replace-Govind-Gawade-as-minister
गोविंद गावडे Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून वगळल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार यावर राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मंत्रिमंडळ फेरबदलासाठी हिरवा कंदील दिल्याने आणखी काहींची मंत्रिपदे काढून घेऊन त्यांच्या जागी आमदार दिगंबर कामत, रमेश तवडकर व मायकल लोबो यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे कळते. त्यामुळे अनेक मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांना डच्चू देण्याचा निर्णय आपलाच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे सर्वच मंत्री सावध झाले असून मुख्यमंत्री आता कोणता निर्णय घेतात, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

आदिवासी समाजाची संख्या पाहता गावडे यांच्या जागी रमेश तवडकर यांना मंत्री करणे भाजपला भाग आहे. एका आदिवासी (एसटी) आमदाराला मंत्रिमंडळातून वगळल्यास दुसर्‍या आदिवासी आमदाराला मंत्री करावे, अशी मागणी गाकुवेधनेही केली होती. त्यामुळे आदिवासी समाजाची नाराजी कमी करण्यासाठी तवडकर यांना मंत्री करावे लागेल. तवडकर यांना सभापतिपदी कायम ठेवल्यास आमदार गणेश गावकर यांना मंत्रिपदाची संधी द्यावी लागणार आहे. येत्या चार दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याने नेमके कुणाला वगळले जाते व कुणाला संधी दिली जाते, हे पाहावे लागेल.

आजारी असलेले कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांना वगळण्याची मागणी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण सिक्वेरा यांना मंत्रिपद दिल्यामुळे त्याचा पक्ष वाढीसाठी कोणताही फायदा झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला फारच कमी मते मिळाली होती. तसेच भाजप सदस्यता मोहिमेमध्ये नुवेत अल्प प्रतिसाद मिळाला होता. पक्षवाढीसाठी लाभ नाही त्याला मंत्रिपदी ठेवू नये, अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे. त्यातच आता सिक्वेरा अनेक दिवस आजारी असल्यामुळे त्यांना वगळून काँग्रेसमधून आलेल्या नेत्यापैकी एकाला संधी दिली जाणार असल्याचे कळते.

तवडकरांना जास्त संधी

सभापती रमेश तवडकर हे भाजपचे जुने नेते आहेत. गणेश गावकर व रमेश तवडकर यांच्यात तवडकर उजवे ठरतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची जास्त शक्यता आहे.

बी. एल. संतोष येणार !

गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोवा प्रभारी बी. एल. संतोष येत्या चार दिवसांत गोव्यात येणार आहेत. ते आल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय होणार असून त्याचवेळी नवे मंत्री व वगळण्यात येणार्‍या मंत्र्यांची नावे निश्चित होतील.

गावडेंना मीच वगळले : मुख्यमंत्री

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून मीच वगळले आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी मी घेत आहे. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. गावडे यांच्या जागी मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे ते अद्याप नक्की झालेले नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गुरुवारी पर्वरी येथे सचिवालयाच्या बाहेर पत्रकारांनी गावडे यांना मंत्रिपदावरून काढण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. आपण गोविंद गावडे यांना वगळले आहे. नवे मंत्री घेण्याबाबत काही ठरलेले नाही. काही निर्णय झाला तर लवकर सांगू, असे म्हणत मुख्यमंत्री निघून गेले.

फळदेसाई सभापती?

सभापती असलेले तवडकर यांना मंत्रिपद दिल्यास समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांना सभापती केले जाऊ शकते, अशी एक चर्चा आहे. गणेश गावकर यांच्यापेक्षा फळदेसाई सभापतिपद सांभाळण्यास अधिक सक्षम असल्याचे काहींचे मत आहे; मात्र ते मंत्रिपद सोडून सभापतिपद स्वीकारतील का, यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्यांनी सभापतिपद स्वीकारले तर गणेश गावकर यांना मंत्रिपदाचा लाभ मिळणार नाही. सोबतच हळर्णकर हे सेफ झोनमध्ये जातील, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. गावडे, सिक्वेरा व फळदेसाई यांच्या जागी तवडकर, कामत व लोबो मंत्रिमंडळात येऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news