वाघेरी डोंगर विकला नाही, विकणार नाही : मंत्री विश्वजित राणे

राखीव वनक्षेत्र म्हणून सुरक्षित ठेवणार
wagheri hill not sold wont be sold says minister vishwajit rane
पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना वनमंत्री विश्वजित राणे. बाजूस वन अधिकारी कमल दत्ता, नमिता बी.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : सत्तरी तालुक्यातील वाघेरी डोंगर विक्री केल्याच्या अफवा पसरवल्या जातात. त्या खोट्या आहेत. वाघेरी डोंगर विकलेला नाही की विकला जाणार नाही. हा डोंगर वन्यजीव अभयारण्याचा भाग करण्याचा किंवा राखीव वनक्षेत्र म्हणून सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन वन व नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी पणजी येथे वन अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर केले. पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते.

यावेळी प्रधान वनसंरक्षक कमल दत्ता, वनसंरक्षक नमिता बी व इतर वन अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, वाघेरी डोंगराच्या मालकीत आपले वडील भागीदार आहेत. त्यांनी नेहमीच वनांचे संरक्षण केले. आपणही राज्यातील वनांचे संरक्षण करत आहे. नियमबाह्य वृक्षतोड कुठेच करण्यास परवानगी दिली जात नाही. वाघेरीवर रस्ता करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर एफआरआय दाखल केला जाणार आहे. राज्यातील सॉ मिलचे ऑडिट करण्यासह युवकांना वनक्षेत्राकडे आकर्षीत करण्यासाठी शाळा महाविद्यालयात जागृती केली जाणार आहे. बोंडला वन्यजीव केंद्राचे लवकरच उद्घाटन होईल.

‘बेडूक बचाव’ अभियान

पावसाळा जवळ येत असल्याने ‘बेडूक बचाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या भागात बेडूक पकडले जातात तेथे वन अधिकारी जाऊन लोकांत जागृती करतील. बिबटे लोकवस्तीत का येतात, यावर उपाय केले जातील. ब्लॅक पँथरचा झालेला अपघाती मृत्यू वेदनादायी असून येत्या काळात ज्या भागात वन्यजिवांचा संचार आहे तेथील रस्त्यावर वेग नियंत्रण फलक लावणे, प्राणी कॉरीडोर बांधणे हे उपक्रम राबवले जातील, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

मगरींची मोजणी होणार

राज्यात मगरींची संख्या वाढली आहे. लोकवस्तीजवळ त्यांचा संचार वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी मगरींची मोजणी करून त्यांच्या नियंत्रणासाठी खास उपाय योजले जातील, असे मंत्री राणे म्हणाले.

...तर ताबा प्रमाणपत्र नाही

नवीन इमारती बांधताना सिंगापुरच्या धर्तीवर व्हर्टीकल फॉरेस्ट वनीकरण उपक्रम बिल्डरला राबवावा लागेल. शहरात वनक्षेत्र वाढावे, यासाठी हा उपक्रम आहे. तसे न केल्यास इमारतीला ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट (ताबा प्रमाणपत्र) दिले जाणार नाही, असा इशारा मंत्री राणे यांनी दिला.

कामात हयगय करणार्‍यांची गय नाही

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकार्‍यांच्या निलंबनाबद्दल मंत्री राणे यांना विचारले असता, कामात हयगय करणार्‍यांची गय केली जाणार नाही. लोकांना चांगले खाद्यपदार्थ मिळणे गरजेचे आहेत, असे मंत्री राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news