

पणजी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपमधील हालचालींना वेग आला आहे. गोवा भाजपमधील नेत्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. यात विश्वजित राणे आणि रमेश तवडकर यांचा समावेश आहे, तर मंत्रिमंडळात काही आमदारांनाही संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने भरघोस यश मिळवले आहे. लवकरच भाजप नेतृत्वाखालील सरकार तिथे अस्तित्वात येत असून या निवडणुकीत सक्रिय राहून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मंत्री विश्वश्जित राणे यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्यावर कोकणची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या ठिकाणच्या 12 मतदारसंघांपैकी गुहागर वगळता 11 ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे राणे यांना पदोन्नती देऊन त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते सभापती पदाचा राजीनामा देतील आणि मंत्रिपद स्वीकारतील, अशी माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याने महाराष्ट्रात लवकरच भाजप नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात येणार आहे. या सरकारचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर उपस्थित होते.
गोव्यातील डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये फेरबदलाची चर्चा मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा होती. यापैकी केवळ आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यात आले असून आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प अमोणकर या इच्छुकांपैकी काहींना मंत्रिपदे मिळतील, अशीही शक्यता होती, सध्या मायकल लोबो यांच्याऐवजी त्यांची पत्नी डिलायला लोबो यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यावर दिल्लीत आणि राज्यातील नेत्यांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. याशिवाय नीलेश काब्राल यांचेही नाव सभापतीपदासाठी चर्चेत आहे.
राज्यात ‘कॅश फॉर जॉब’ भुतानी, झुआरी जमीन घोटाळा आणि इतर आर्थिक अनियमितता यामुळे नेतृत्व बदलाची चर्चा सुरू होते; मात्र सध्या तरी नेतृत्वात कोणताच बदल होणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे महाराष्ट्रातील 30 मतदारसंघांची जबाबदारी होती. या मतदारसंघांमध्येही मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने मुख्यमंत्री यशस्वी ठरल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर सध्यातरी पक्षश्रेष्ठी खूश आहेत, अशी दिल्लीत चर्चा असून त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात येईल; मात्र तूर्तास ‘आहे ते चालू द्या’ असा निरोप आहे. येत्या काळात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केंद्रातील जबाबदारी येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.