Goa : प्रदूषणकारी राक्षस सांतोणच्या उरी

लोहखनिज, डांबर हॉटमिक्सिंगनंतर खडी क्रशरने ग्रामस्थ हैराण
villagers-troubled-by-stone-crusher-after-iron-ore-and-hotmixing
सांतोण : गावात सुरू असलेला खडी क्रशरचा प्रकल्प. 2) हाताला लागलेली क्रशरची भुकटी.Pudhari File Photo
Published on
Updated on
विशाल नाईक

मडगाव : असंख्य प्रदूषणकारी प्रकल्पांमुळे काळवंडलेल्या सांतोण गावात लोहखनिजाचा प्रदूषणकारी प्रकल्प आणि डांबराच्या हॉटमिक्स प्लांटनंतर, धूळ आणि ध्वनी प्रदूषणामुळे लोकांचे जगणे कठीण करून ठेवलेल्यात आणखी एका खडी क्रशरची भर पडली आहे. प्रदूषणकारी प्रकल्पांचा राक्षस सांतोण उरावर बसून गणे गावाला गिळंकृत करायला निघालाय.

सावर्डे मतदारसंघात येणारा पण सांगेचे महसूल क्षेत्र म्हणून परिचित असलेला सांतोण हा गाव बेकायदा कृत्यांचे केंद्र बनला आहे. पंचायतीचे तात्पुरते परवाने घेऊन वर्षानुवर्षे प्रकल्प चालवले जातात. आतापर्यंत डझनभर प्रकल्प या परिसरात सुरू आहेत. खडी क्रशरपासून हॉटमिक्स डांबरीकरण आणि लोहखनिजाचे कारखाने तसेच बेकायदा चिरेखाणी आदींचा समावेश आहे. सांगेचे महसुली क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सांतोणमधून सरकारला एकही रुपयाचा महसूल प्राप्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन वर्षात डझनभर कारखाने तात्पुरत्या कार्यासाठी उभारून नंतर बंद केले गेले. पुढेही असेच चालेल यात शंका नाही; पण त्या कारखान्यांच्या प्रदुषणामुळे मात्र जीव जात आहे, अशी प्रतिक्रिया आंबेउदक येथील प्रीती देसाई यांनी दिली. प्रीती यांचे घर या कारखान्यापासून सुमारे 300 मीटर अंतरावर असून त्या परिसरात एकूण आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रकल्पातील धुळीमुळे लोक घरे बंद ठेवत आहेत.अनेकांना दम्याचा त्रास होत आहे. चार गावांसाठी हे प्रकल्प जीवघेणे बनले आहेत.

ग्रामस्थ तुळशीदास देसाई यांनी दिलेल्या माहीतीनुसार, पंचायतीकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही. उलट सर्वसामान्य लोकांची कामे अडवून धरली जात आहेत. सायंकाळी 4 च्या दरम्यान कारखाने सुरू केले जातात. काळ्या भुकटीमुळे मी दुकान बंद ठेवले आहे. शिवाय 90 वर्षीय म्हातार्‍या आईला दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर केले. सुरुवातीला लोह खनिज प्रकल्प सांतोणमध्ये सुरू झाले. दोन वर्षांपूर्वी त्यतील एका लोह खनिज कारखान्याने विस्तारीकरणासाठी सरकार दरबारी परवानगी मागितली होती; पण जनतेचे मत जाणून घेतल्याशिवाय सरकार अशा प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला परवानगी देऊ शकत नाही, असा नियम असल्यामुळे कुडचडेच्या रवींद्र भवनात जनसुनावणी घेण्यात आली. ज्यात 99 टक्के ग्रामस्थांनी (कुडचडे आणि सावर्डे) विरोध केला. सरकारने कोणता निर्णय घेतला याची माहिती गावकर्‍यांना दिलेली नाही. मात्र, 99 टक्के लोकांचा विरोध असलेल्या त्या कारखान्याचे विस्तारीकरण होऊन त्यात उत्पादन प्रक्रियाही सुरू झाली आहे. चोरीछुपे कारखान्याच्या विस्तारीकरणाला परवानगी द्यायची होती, तर मग सुनावण्या घेऊन लोकांचा वेळ तरी वाया का घालवला, असा प्रश्न प्रीती देसाई यांनी उपस्थित केला.कारखान्याचा आवाज आणि धुळीमुळे बर्‍याच वर्षांपासून गावकर्‍यांनी सार्वजनिक असा कोणताही उत्सव साजरा केला नाही. काजू बागायती व इतर स्वरूपाच्या कृषी उत्पन्नावर घर चालत होते कारखान्यातून निघणारे काळ्या भुकटीमुळे बागायती नष्ट झाली असून स्लेग स्वरूपाची काळी भुकटी श्वसनाचे विकार होण्यास कारणीभूतही ठरू लागले आहेत, असे प्रीती देसाई म्हणाल्या.

धनेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराजवळील सुरू असलेला प्रथमेश नावाच्या फोंडा येथील व्यक्तीचा खडीचा क्रशर पूर्णपणे बेकायदा असून त्या कारखान्याला फॅक्टरीज आणि बॉयलर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण खाते, वन खाते व स्थानिक पंचायत यापैकी कोणाचाही परवाना नाही. सावर्डे पंचायतीकडून तात्पुरता परवाना मिळवून खडीचे क्रशर चालवले जातात, असा दावा त्यांनी केला. ज्या लोकप्रतिनिधींना हाताशी धरून या कारखान्याला तात्पुरता परवाना मिळत आहे. तेच लोकप्रतिनिधी फार दूर वास्तव्य करून राहतात. त्यांच्या तोंडून एक ब्रही निघत नाही. ही विचार करण्याची गोष्ट आहे, असा आरोप धनेश देसाई यांनी केला आहे.

खाणी बंद पडल्याने उदरनिर्वाहाचे एकमेव साधन संपुष्टात आले. चरितार्थ चालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या आहेत. लोकांवर बेकायदा चिर्‍यांच्या खाणी आणि नदीतून रेती काढण्यासारखे बेकायदा व्यवसाय करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सरकारचा महसूल चुकवून नैसर्गिक संसाधने लुटणार्‍या या व्यावसायिकांवर स्थानिक लोकप्रतिनिधींची कृपादृष्टी असल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत.

काम थांबवण्याचे आदेश तरीही...

सावर्डेच्या ग्रामसभेत अनेकवेळा हा विषय गाजला. मात्र, स्थानिक पंच सदस्य साधा आक्षेपही घेत नाही. वर्षभरापूर्वी लोकांनी आवाज उठवल्यानंतर पंचायतने खडी क्रशरचे काम थांबवण्याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस जारी केली. त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. राज्यात भाजप सरकार आणि सावर्डे पंचायतीवर भाजपचे मंडळ कार्यरत असूनही प्रदूषणाची समस्या दृष्टीस येत नाही का, असा प्रश्न आंबे उदकचे रहिवासी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news