

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा गंभीर मुद्दा आज आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत उपस्थित केला. आरोग्य संचालनालयात २९ टक्के पदे रिक्त असल्याचे त्यांनी आकडेवारी मांडत सरकारचे लक्ष वेधले.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य सेवा, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था, गोवा दंत महाविद्यालय, अन्न आणि औषध प्रशासन, नगर आणि देश नियोजन, नगरपालिका प्रशासन, महिला आणि बाल विकास, वन खात्यांवरील मागण्यांना विरोध करताना आमदार सरदेसाई यांनी हे आरोप केले.
आरोग्य संचालनालयात मंजूर असलेल्या ४,४८९ पदांपैकी १,२८१ पदे रिक्त असून जवळपास २९ टक्के मनुष्यबळाची कमतरता आहे. महत्त्वाच्या तज्ज्ञ पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्तता आहे. त्यात १२ पैकी १० वरिष्ठ शल्यचिकित्सक, ८ पैकी ७ वरिष्ठ फिजिशियन, ७ पैकी ५ ऑर्थोपेडिक सर्जन, ७ पैकी ६ ज्युनियर सर्जन, १७ पैकी ११ अॅनेस्थेटिस्ट, ९ पैकी ६ रेडिओलॉजिस्ट, याशिवाय नर्स, फार्मासिस्ट, एमपीएचडब्ल्यू आणि ४३४ मल्टी टास्किंग स्टाफ पदेही रिक्त असल्याचे त्यांनी निदर्शनसा आणून दिले. निदान सेवांवरही परिणाम झाला असून ३८ पैकी १९ एक्स-रे तंत्रज्ञ आणि २३ लॅब तंत्रज्ञांची पदे रिक्त आहेत.
उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातही कर्मचारी तुटवडा आहे. या इस्पितळासाठी मंजूर ५२९ पदांपैकी १३३ पदे रिक्त आहेत. या रुग्णालयात वरिष्ठ फिजिशियन आणि मेडिको लीगल ऑफिसरच नाही, तसेच अॅनेस्थेटिक तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, २३ स्टाफ नर्स आणि ४८ मल्टी-टास्किंग स्टाफ पदांची कमतरता आहे. त्यामुळे आपत्कालीन सेवा आणि निदान प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तुये सरकारी रुग्णालयातही तज्ञांची कमतरता असून मंजूर १५१ पदांपैकी ५७ पदे रिक्त आहेत. येथे शल्यचिकित्सक, अॅनेस्थेटिस्ट, फिजिशियन, बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ तज्ज्ञांची कमतरता आहे. ११ पैकी ७ वैद्यकीय अधिकारी, १६ पैकी ८ नर्स, तसेच १८ मल्टी-टास्किंग स्टाफ पदे रिक्त आहेत.
२०२५ मध्ये ११,७३८ रुग्णांना गोमेकॉ इस्पितळाकडे पाठवण्यात आले त्यामध्ये दक्षिण गोवा इस्पितळ ४,६५६, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ ४,१२४. उपजिल्हा फोंडा इस्पितळ २,९५८, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधूनही गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले त्यामध्ये हळदोणे येथून सुमारे १,९४० रुग्ण, तर बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रातून २०२१ साली ४३६ वरून २०२५ सालपर्यंत ९५९ इतके दुप्पट झाले. खोर्ली आरोग्य केंद्रातूनही १५ वरून ७९४ पर्यंत वाढले आहे, असे त्यांनी सांगितले आणले.