

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
विद्यानगर घोगळ येथील व्यावसायिक मतभेदातून झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेला आरोपी भरत चौधरी याला येत्या शनिवारी १७ रोजी शिक्षा ठोठावणार आहे. सरकारी पक्ष व प्रतिवादीच्या वकिलांकडून शिक्षा सुनवण्यापूर्वी युक्तीवाद झाले. मागच्या आठवड्यात दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने भरत चौधरी याला दोषी ठरविले होते. सोमवारी त्याच्या शिक्षेसंबंधी दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. आरोपीवर ललित ऊर्फ डुंगराम चौधरी याच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप होता. ७ जानेवारी २०२३ रोजी वरील घटना घडली होती. भरत याने ललित याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला होता. यात ललित हा गंभीर जखमी झाला होता. ललित हा विद्यानगर येथे भाड्याने हार्डवेयरचे दुकान चालवित होता. भरत हा त्याच्याकडे कामाला होता. दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. या घटनेनंतर भरत फरार झाला होता. फातोर्डा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी नंतर त्याला अटक केली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३०७ कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. सरकार पक्षातर्फे वकील गोविंद गावकर यांनी युक्तिवाद केले.