

पणजी : पर्यायी औषध पद्धतींवर लक्ष केंद्रित करा, असे सांगत आपल्या प्राचीन ग्रंथांना समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक सुलभ तसेच समर्पक ठरतील असे रूप देण्यासाठी त्यांचे पुराव्यावर आधारित प्रमाणीकरण करा, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केले आहे. दोनापावला येथील राजभवनात गुरुवारी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते महर्षी सुश्रुत व आचार्य चरक यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या विशेष कार्यक्रमास राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीज र्ामंत्री सुदिन ढवळीकर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपालांच्या पत्नी रीटा एस. पिल्लई, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती धनकड म्हणाले, आपण एक वेगळे राष्ट्र आहोत. आपण आपल्या मुळांचा नव्याने शोध घेत आहोत. भारत हा पर्यायी औषधोपचार पद्धतीचा पुरस्कर्ता असल्यामुळे मी पर्यायी औषध पद्धतीवर मोठ्या प्रमाणात भर देतो. ते आजही व्यापक प्रमाणात प्रचलित आहेत. आपल्या प्राचीन ग्रंथांना ग्रंथ संग्रहालयापुरते सीमित ठेवले जाऊ नये. ते संग्रहालयाची शोभा वाढवण्यासाठी नाहीत. या ग्रंथांतील ज्ञान मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले पाहिजे. आधुनिक वैज्ञानिक साधनांचा वापर करून आपण संशोधन, नवोन्मेष तसेच पुनर्व्याख्येच्या माध्यमातून कालातीत संकल्पनांना संजीवनी देऊया.
हा मौलिक खजिना प्राप्त करण्यासाठी आणि समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी समर्पक त्यातील ज्ञानाचा वापर करण्यासाठी पुराव्यावर आधारित प्रमाणीकरण, डिजिटलायझेशन, अनुवाद तसेच बहु -विषयक अध्ययन अशा विविध मार्गांचा पाठपुरावा करूया. गुजरातमध्ये जामनगर येथे जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना करून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधपद्धतीला मान्यता दिली याचा मला अत्यंत आनंद आहे. इतिहासातील आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे यांच्यात पुन्हा डोकावण्याची आणि आपल्या मुलांना त्यांच्या जन्मापासूनच आपल्या संस्कृतीच्या सखोल ज्ञानाबद्दल सांगण्याची वेळ आता आली आहे, असे उपराष्ट्रपती धनकड म्हणाले.