

विशाल नाईक
मडगाव : मांडवीवर समांतर पूल, मडगावचा पश्चिम बगलमार्ग, प्रसिद्ध अटल सेतू तसेच पेडणेला काणकोणशी जोडणारा महामार्ग या सारख्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या साधन-सुविधांमुळे गोव्याच्या विकासात आणि महसुलात मोलाची भर पडली आहे. आंतरराज्य वाहतूक व्यवस्थेसाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून पैसा आणि वेळेची बचत होऊ लागल्याने व्यापारीवर्गही खुश आहेत. पण विकासाच्या प्रवाहाविरुध्द जात शेकडो वर्षांपासून गोव्याची वनसंपदा आणि संस्कृती राखून ठेवलेल्या डोंगरमाथ्यावरील वावुर्ला गावाला, स्वातंत्र्याच्या 64 वर्षानंतर पहिल्यांदाच मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांत दीड कि.मी.सुद्धा पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अवकाशात झेप आम्ही शिक्षणाच्या बळावर घेऊ तुम्ही फक्त शाळेला जायला रस्ता बांधून घ्या, अशी आर्त विनवणी वावुर्लाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
केपे मतदारसंघाच्या डोंगरमाथ्यावरील वावुर्ला या आदिवासी समाजाच्या गावांना स्वातंत्र्याच्या 64 वर्षांनंतरही रस्ता प्राप्त झालेला नाही. मजल-दरमजल करत आजही या गावातील लोक डोंगरमाथ्याच्या कच्च्या मार्गाचा वापर करून ये-जा करत आहेत. पोर्तुगीज काळात स्वातंत्र्यसैनिक या गावाचा वापर लपण्यासाठी करत असत, असे गावकरी सांगतात. डोंगरमाथ्यावरील सर्वात उंचीवरील या गावात रस्त्याआभावी रुग्णवाहिकाही पोहोचू शकत नाही. बर्याचदा तर रुग्णांना पालखीत घालून सुमारे आठ किलोमीटर मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत आहे.
वन खात्याचे कायदे, डोंगराच्या खासगी जागा अशा असंख्य अडचणींमुळे कित्येक वर्षे प्रयत्न करूनसुध्दा रस्त्याचे काम मार्गी लागत नव्हते. अखेर चार वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी निविदा जारी झाली होती. पण ज्या कंत्राटदाराला केवळ एक ते दीड कि.मी. एवढ्याच रस्त्याचे काम पूर्ण करता आले आहे. उर्वरित रस्ता पूर्वीप्रमाणे तशाच अवस्थेत असून पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलातून वाट काढत जाताना लोकांना कसरत करावी लागत आहे. दरदिवशी जंगलातील वाटेने किमान पाच किलोमीटर चालावे लागत असल्याने पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसर्या ठिकाणी पाठवले आहे.
माजी पंचायत सदस्य सदा गावकर म्हणाले, रस्त्याची गरज गावकर्यांना फार पूर्वीपासून आहे. गावात कोणी आजारी असल्यास त्यांना बारा तेरा जण पालखीत घालून खाली मुख्य रस्त्यापर्यत आणतात. आठवड्याभरापूर्वी मी दुचाकीने दोघांना रस्त्यापर्यत आणून इस्पितळात नेले होते. रेंगाळत चललेले काम तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारला आजपर्यंत या गावाला पक्का रस्ता बांधून देता आलेला नाही. पिढ्यानपिढ्यांपासून गावकरी पायवाटेचा वापर करत आहेत. रूग्णवहिका गावात जाऊ शकत नाही. त्यामुळे रुग्णांना पाळण्यात घालून खाली मुख्य ररस्त्यापर्यंत आणले जाते.
2021 मध्ये वावुर्लातील रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली होती. वावुर्ला ते कुडे येथील मुख्य रस्त्यापर्यतच्या कामाला 2023 मध्ये सुरुवात झाली होती. पुढे पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे काम बंद पडले. अर्धवट काम, त्यात पावसामुळे कोसळलेली दरड, चिखल अशा परिस्थितीत गावकर्यांनी पावसात प्लास्टिक गुंडाळून गणपतीच्या मूर्ती वावुर्लात नेऊन चतुर्थी साजरीं केली होती. पावसामुळे दरड कोसळून पायवाट बंद झाली आहे. झाडेही कोसळून रस्त्यावर आली आहेत. रस्त्यावरील माती वाहून गेली आहे. विद्यार्थी बिचारे जीव धोक्यात घालून ये-जा करत आहेत.