

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातून चालवण्यात येत असलेल्या व क्रिकेट, फुटबॉलसह विविध क्रीडा सामन्यांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या कथित रॅकेटचा वसई (मुंबई) क्राईम ब्राँचने पर्दाफाश करताना नऊजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३३ मोबाईल, ६९ एटीएम कार्ड, ४० सिमकार्डसह १९.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे गोवा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे रॅकेट क्रिकेट, फुटबॉल, तसेच इतर खेळांच्या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा स्वीकारण्यासाठी कार्यरत होते. सट्टेबाजीच्या आर्थिक व्यवहारांसाठी आरोपी इतर व्यक्तींच्या नावावर नोंदणीकृत बँक खाती आणि सिमकार्डचा वापर करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नायगाव पूर्व परिसरातील एका ठिकाणी वसई क्राईम ब्राँचने गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाचा विस्तार केला. तपास करताना या रॅकेटचे धागेदोरे गोव्यापर्यंत पोहोचले.
त्यानंतर पोलिसांनी उत्तर गोव्यातही कारवाई करत या कथित सट्टेबाजी नेटवर्कशी संबंधित आणखी संशयितांचा शोध घेतला. पोलिसांनी ३३ मोबाईल फोन, चार लॅपटॉप, ७८ पासबूक व चेकबूक, ६९ एटीएम कार्ड आणि ४० सिमकार्ड जप्त केले. याशिवाय दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १९ लाख ८६ हजार रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सट्टेबाजीच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील तपासला जात आहे. जप्त केलेल्या बँक खात्यांमधील व्यवहार, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड कोणाच्या नावावर आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.