वाळपई : हवामान खात्याने पावसाचा ‘यलो अलर्ट’ जाहीर केलेला असतानाही शिवोली येथील एस. एफ. एक्स. उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी चरवणे धबधब्यावर पदभ्रमण मोहिमेसाठी आले होते. मात्र, अचानक मोठा पाऊस कोसळल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पदभ्रमण मोहिमेवर आलेले 47 विद्यार्थी व पाच शिक्षक अडकले. वाळपई अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांनी त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात पणजी येथील रोझरी विद्यालयाचे विद्यार्थी पाली येथील धबधब्यावर अडकले होते. पावसाळ्यात धबधब्याच्या व डोंगराळ भागांमध्ये पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात येत असते. शिवोली येथील एस. एफ. एक्स. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अकरावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी पदभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये 47 विद्यार्थी, विद्यार्थिनी व पाच शिक्षकांचा एक गट सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चरावणे धबधब्यावर गेला होता. निसर्गाची माहिती, वेगवेगळ्या झाडांची माहिती, डोंगराळ भागांमध्ये पदभ्रमण करण्याच्या अनुभव या संदर्भात माहिती देण्यात आली होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मुसळधा पाऊस सुरू झाला. त्यामुळे धबधब्यामधून चिखल मिश्रित पाणी खाली येऊ लागले. प्रसंगावधान राखून धबधब्यावर असलेल्या मुलांनी व शिक्षकांनी धबधब्यातून बाहेर आले. शिक्षकांनी विद्यार्थी अडकल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सर्व यंत्रणा सतर्क केली. त्यानुसार काही मिनिटांमध्ये अभयारण्य परिक्षेत्र विभागाच अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दोरखंडाच्या सहाय्याने सुखरुपपणे नदीच्या पलिकडे काढले. हे बचाव कार्य सुमारे दोन तास सुरू होते.
हवामान खात्याने 23 व 24 रोजी पावसाचा यलो अर्लट जारी केला होता. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असतानाही विद्यालयाच्या प्रशासनाने पदभ्रमण मोहिमेचे आयोजन का केले, अशा प्रश्न घटनास्थळावर विचारला जात होता. अशा प्रकारचा चुकीचा निर्णय मुलांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे शाळांनी धोका पत्करू नये, असे आवाहन चरावणे ग्रामस्थांनी केले आहे.