

पणजी : उझबेकिस्तानहून थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे गोवा एक लोकप्रिय आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत आहे. 3 डिसेंबर रोजी आलेल्या या फ्लाइटमुळे दोन्ही ठिकाणांमधील पर्यटन आणि आपसी संपर्काला नवी चालना मिळाली आहे.
ही फ्लाइट ए-320 विमान घेऊन ताश्कंद, उझबेकिस्तानहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोप येथे दुपारी 12.49 वा. 121 प्रवाशांसह उतरली. पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘उझबेकिस्तानसोबतची ही थेट कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू झाल्यामुळे गोव्याचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक मजबूत झाले आहे. जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या फ्लाइटमुळे दोन्ही प्रदेशांमध्ये प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे. पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, ‘ही सेवा पुन्हा सुरू होणे म्हणजे गोव्याच्या पर्यटन क्षमतेवर आंतरराष्ट्रीय भागीदारांचा वाढता विश्वास. आता उझबेकिस्तानमधील प्रवाशांना गोव्याची संस्कृती, सण, आणि विविध अनुभव अधिक सुलभतेने अनुभवता येतील.