

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी महापालिकेतील सुरू असलेली घराणेशाही मोडीत काढण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. पणजीकरांना पारदरर्शक कारभार देण्यासाठी आम्ही पणजीकर पॅनल मैदानात उतरले आहे.
सुयोग्य प्रशासनासोबत शहरातील पे पार्किंग रद्द करून शहरात मोफत पार्किंग करणार असल्याचे प्रतिपादन आम्ही पणजीकर पॅनेलचे प्रमुख उत्पल पर्रीकर यांनी केले. पणजी येथे रविवारी पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी आपल्या पॅनलचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, निवडून आलेला प्रत्येक नगरसेवक हा बोलणारा हवा.
पणजीचा कारभार स्वच्छ व पारदर्शक हवा असेल, तर लोकांनी आम्ही पणजीकर पॅनलला साथ देणे गरजेचे आहे. जाहीरनामा उमेदवारांनी लोकापर्यंत पोचवला आहे. पणजीकरांसाठी पायाभूत सुविधा, मोफत पार्किंग, सकारात्मक कारभार आणि सर्व प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपल्या पॅनलचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.
स्थानिकांना सध्या वाहने पार्किंग करण्यास जागा मिळत नाही. पे पार्किंगचा लाभ महापालिकेला कमी व कंत्राटदाराला जास्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे पणजीतील गॅरेज जुने झाल्याने मोडले जाणार आहे. त्यासाठी उंच पार्किंग प्लाझा इमारत बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आमच्या पॅनलला सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळत आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या सोबत असलेले अनेकजण आमचे उमेदवार आहेत. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या पॅनलच्या जाहिरातीत पक्षाचे चिन्ह घातलेले नाही. त्यावरुन कोण भाजप आणि कोण भाजपचा नाही ते जनतेने ठरवावे. कॅसिनो काढण्याचे काम हे सरकारचे आहे.
मात्र, महापालिकेच्या अखत्यारित ज्या गोष्टी येतात, त्यावर निश्चितपणे आमचे पॅनेल विचार करेल. मांडवी नदीचे रक्षण, पर्यावरण, स्वच्छता, अनियमित पार्किंग यावर फेरविचार होईल. स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप केला.
उमेदवारांचे पॅनल बदल
मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमधील काही उमेदवार आपण उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजीकर पॅनलचे असल्याचे मतदारांना सांगत आहे. त्यावरून निवडणुकीचे वारे कोणत्या बाजूला वाहात आहेत, हे मतदारांनी लक्षात घ्यावे, असे उत्तर याबाबत बोलताना पर्रीकर यांनी दिले.