

पणजी : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या आठवड्यात गोव्याला भेट देऊन पर्वरीतील सहापदरी उन्नत मार्ग प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीच्या सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी ६४१ कोटी रुपयांच्या पर्वरी उन्नत मार्गाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर उड्डाणपुलावरील काही उणिवा निदर्शनास आल्यानंतर केंद्रीय महामार्ग विभागाने त्याची दखल घेतली आहे.
अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, अतिवेगाला आळा घालण्यासाठी अटल सेतू आणि पर्वरी उड्डाणपुलादरम्यानचा सुमारे ३०० ते ३५० मीटरचा पट्टा प्राधान्य क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या भागात वाहतूक नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. उड्डाणपूल, अटल सेतू आणि पर्वरी परिसरात वाहतूक सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत.
इंडियन रोड्स काँग्रेसने निश्चित केलेल्या नवीन नियमांनुसार हा उन्नत मार्ग चारपदरी रचनेत बांधण्यात आला आहे. या मार्गावर ताशी ६५ किलोमीटर, तर अटल सेतूवर ताशी ५० किलोमीटर वेगमर्यादा आहे. वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावलेले असतानाही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. उड्डाणपूल ते अटल सेतू जोडमार्गावर चालकांकडून वेगाने वाहने चालवली जात असल्याचेही आढळून आले आहे.
नवीन उपाययोजना यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, गोव्यातील तज्ज्ञांनी ११ सप्टेंबर रोजी उड्डाणपूल खुला झाल्यापासूनच काही बाबी निदर्शनास आणून दिल्या होत्या. ताशी ६५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या अवजड व्यावसायिक वाहनांसाठी उन्नत मार्गावरील ३.५ मीटर रुंदीची लेन अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लेनची रुंदी आणि वेगमर्यादेत तफावत...
अटल सेतू आणि पर्वरी उड्डाणपुलादरम्यान सुमारे ३०० मीटरच्या पट्ट्यात लेनच्या रुंदी आणि वेगमर्यादेतही तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. अटल सेतूवरील लेन ४.२५ मीटर रुंद असून वेगमर्यादा ताशी ५० किलोमीटर आहे. त्याउलट पर्वरी उड्डाणपुलावरील लेन ३.५ मीटर रुंद असून तिथे ताशी ६५ किलोमीटर वेगमर्यादेला परवानगी आहे.