

फोंडा : प्रतापनगर-धारबांदोडा भागातील जंगलात एका अज्ञात युवतीचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार उघड झाल्याने खळबळ माजली. सोमवारी (दि. 16) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. युवतीची रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नाही. त्यामुळे या खुनाचा गुंता सोडविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
प्रतापनगर-धारबांदोडा भागात ज्या ठिकाणी काजू व इतर जंगली झाडे असलेल्या झाडीत हा मृतदेह सापडला. या ठिकाणी कच्चा रस्ता असून तेथून पुढे जंगल आहे. सकाळी कुणीतरी हा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाजवळ एक रेल्वे तिकिट सापडले असून तीच एकमेव तपासाची दिशा ठरली आहे.
पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर, पोलिस निरीक्षक राघोबा कामत तसेच पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी घटनास्थळी जाऊन तपासाला वेग दिला. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकाला आणून तपास केला. मात्र, श्वान घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत आले आणि घुटमळले. पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी इस्पितळात पाठवला असून पुढील चौकशी सुरू आहे.
युवतीच्या मृतदेहा शेजारी सापडलेले रेल्वे तिकीट हे कर्नाटक राज्यातील आहे. त्यामुळे पोलिसांनी या तिकिटाच्या आधारे तपासाला गती दिली आहे. त्या युवतीचा खून करून मृतदेह रानात टाकून दिला की घटनास्थळी तिचा खून केला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. रात्रीच्या वेळी हा खून झाला असावा. मात्र, पावसामुळे रक्ताचे डाग धुवून गेले आहेत. या खुनासाठी चारचाकी वाहन खुन्यांनी वापरली असावे असा कयास असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधण्यास प्रारंभ केला आहे.
मृत युवती ही 20 ते 30 वयोगटातील असून तिच्या अंगावर काळा अर्ध्या हाताचा टी शर्ट व काळी पँट आहे. पायातही काळ्या रंगाचे सँडल्स आहेत. ही युवती गोमंतकीय की बिगर गोमंतकीय याचा शोध लागलेला नाही. मात्र, प्रथमदर्शनी ही युवती बिगर गोमंतकीय असावी, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या धारदार शस्त्राने या युवतीचा गळा चिरून तिचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
प्रतापनगर भागातील रानात सापडलेल्या युवतीची ओळख पटलेली नाही. ओळख पटवण्यासाठी सर्व पोलिस स्थानकांना मृतदेहाचे फोटो पाठवण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली असून बेपत्ता युवतीची कुणाला माहिती मिळाल्यास त्यांनी फोंडा पोलिस किंवा मडगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.