

पणजी : भक्ती, समर्पण सेवा आणि आरोग्य यांचा संगम असणारा भागवत सांप्रदायाचा अनोखा उत्सव चिखलकाला गोव्यातच पाहिला मिळतो. माशेल येथील ऐतिहासिक श्री देवकी कृष्ण मंदिरातील या एकादशी उत्सवाची अलोट गर्दीत सोमवारी 7 रोजी या चिखलकाल्याच्या रूपाने सांगता झाली. हा उत्सव पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात अबालवृद्धांसह पर्यटनमंत्री रोहन खंवटे सहभागी झाले होते.
प्रचंड उत्साह आणि आध्यात्मिक भावनेने साजरा केला जाणारा, चिखलकाला गोव्याच्या परंपरेत खोलवर रुजलेला आगळावेगळा सोहळा आहे. हा उत्सव भगवान कृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांच्या खोडकर, खेळकर क्रिडेची आठवण करून देतो, जो चिखलातील खेळांद्वारे सादर केला जातो. गेल्या काही वर्षांत, हा उत्सव गोव्याच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती बनला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होते. भजन, कीर्तन, पारायण करत दहीहंडी फोडून या प्रतिष्ठित चिखलकाल्याने या उत्सवाचा समारोप होतो. यातील सहभागी मुले, तरुण, वृद्ध, आनंदाने चेंडुफळी, बेडूक खेळ, लग्न सोहळा, कुस्ती तसेच चिखलात इतर खेळांमध्ये सहभागी होतात. भगवान श्रीकृष्णाचे दिव्य खेळ यावेळी साजरे केले जातात. ढोल, घुमट आणि शामेळ सारख्या पारंपरिक वाद्यांसह टाळ पखवाज्याच्या नादात हा उत्सव साजरा होतो. आजही तो इतिहास उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
सहभागी किशोर भगत म्हणाले, हा चिखलकाला आमच्या परंपरा दाखवतो. पंढरपूर प्रमाणे श्री विठ्ठलाची भक्ती तितक्याच तन्मयतेने केली जाते. येथील देवकी कृष्ण मंदिर तर खूप ऐतिहासिक आहे. हा सोहळाही तितकाच जुना आहे. हा उत्सव अनोखा असल्यामुळे आता पर्यटनाला प्रोत्साहन मिळत असले, तरी स्थानिक गोवेकर या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात.