

पणजी : जागतिक योग दिनानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम झाले. मात्र लक्ष वेधून घेतले ते पणजीतील दोन कार्यक्रमांनी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिवर्षीप्रमाणे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. तर आयुष मंत्रालयाचा कार्यभार असलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पणजीतच एक स्वतंत्र कार्यक्रम केला. राजधानी पणजीत शासकीय स्वरूपाचे दोन स्वतंत्र कार्यक्रम का, असा सूर काही भाजप कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाला. एकीकडे राज्यात फेरबदल, खातेबदल याविषयी जोरदार चर्चा असताना या प्रकाराची खमंग चर्चा सुरू झाली.
कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेसह अन्य काही मंत्र्यांना कमी करून त्यांच्या जागी नव्या आमदारांना संधी देण्याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विद्यमान आमदारांपैकी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती रमेश तवडकर, माजी मंत्री मायकल लोबो, त्यांच्या पत्नी डिलायला लोबो, संकल्प आमोणकर यांनीही आज ठिकठिकाणी योग कार्यक्रमात सहभागी होत राजकीय ‘योग’ साधण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळातून अन्य कुणाला वगळले जाणार याविषयीची चर्चाही सुरू आहे. गेले काही दिवस उपचार घेत असलेले आलेक्स सिक्वेरा यांच्यासह अन्य काही मंत्र्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.
पावसाळी अधिवेशनाला महिन्याचा अवकाश असला तरी तत्पूर्वी मंत्रिमंडळातील फेरबदल आणि खाते वाटपाबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबतचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याला केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. खाते बदलात मंत्रिमंडळातील काही वरिष्ठ मंत्र्यांची खातीही काढून घेतली जाणार असल्याचीही चर्चा आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईकही त्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, यातून कोणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या आठवड्यात गोमेकॉतील डॉक्टरांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांनी एकहाती शांत केले होते, त्या पार्श्वभूमीवर राजधानीतील योग दिनाच्या दोन कार्यक्रमांची जरा जास्तच चर्चा झाली.