पणजी : बार्देश तालुक्यातील कांदोळी येथील एका रेस्टॉरंटचे मालक विश्वजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालय म्हापसाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण ऑगस्ट 2018 मधील आहे, ज्यात 07 ऑगस्ट 2018 रोजी विश्वजित सिंग याने त्यांची मोटारसायकल चोरल्याबद्दल त्यांचा एक कर्मचारी उमेश लमाणी याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे नाराज होऊन लमाणी याने आपला मित्र दया शंकर साहू याला सोबत घेऊन विश्वजित सिंग यांचा खून केला व दोघेही पसार झाले होते.
कळंगुटचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व विद्यमान उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी आरोपींना कर्नाटकातून अटक केली होती. आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेली प्राणघातक शस्त्रे जप्त करून साक्षीदार आणि पुरावे गोळा केले. आरोपीची ओळख पटवल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. खुनांत वरील दोन्ही आरोपींचा हात असल्याचे दिसताच आरोपींचा शोध घेऊन त्यांना कर्नाटकातून अटक करण्यात आली. हा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एस. शर्मिला पाटील यांनी दिला.