

मडगाव : गावात दहशत निर्माण करण्यासह धार्मिक चिन्ह असलेल्या जागेतील बेकायदा कुंपण काढून टाकण्याची मागणी करणार्या लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने गावातील युवकाने गुंडाकरवी कोयता, सुरे आणि लोखंडी सळीने दोघा स्थानिकांवर जीवघेणा हल्ला करण्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री उशिरा कुडचडेच्या बेतमड्डी येथे घडला. या हल्ल्यात तीन ग्रामस्थ जखमी झाले आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकर्यांनी एकत्र येत नुवे येथील त्या चारही गुंडांना अर्धनग्न करून जबर चोप देत कुडचडे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून एका कारसह मोठा सुरा, कोयता, लोखंडी रॉड व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त ग्रामस्थांनी त्यांची कार उद्ध्वस्त करून टाकली आहे. या प्रकारामुळे बेतमड्डी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बेतमड्डी हे कुडचडे-काकोडा पालिका क्षेत्रातील गाव आहे. रस्ता डांबरीकरणासाठी किंवा काँक्रीटच्या घरांवर स्लॅब टाकण्याच्या कामासाठी येथील लोकांना ओळखले जाते. गावात एक धार्मिक चिन्ह असून, त्या चिन्हाजवळ घर असलेल्या पण सध्या नुवे येथे स्थायिक झालेल्या कुटुंबातील एका युवकाने आपल्या जागेचे कुंपण त्या धार्मिक चिन्ह असलेल्या जागेतून नेले होते. धामिर्र्क कार्यक्रम होणार असल्यामुळे गावकर्यांनी त्या कुटुंबाला ते कुंपण काढण्यास सांगितले होते; पण त्याने नकार दिल्यामुळे गावकर्यांनीच ते कुंपण काढून टाकण्यास सुरू केले होते.
मनात राग असलेल्या त्या युवकाने बुधवारी दुपारी नुवेतील वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या आपल्या चार मित्रांना बेतमड्डी येथे बोलावले. चारही मित्रांसाठी त्या धार्मिक चिन्हाच्या आवारात पार्टी आयोजित करून त्यांना भरपूर मद्य पाजले. सायंकाळी उशिरा दारूच्या नशेत त्यांनी मुद्दामहून वाद उकरून काढला आणि दोन स्थानिक युवकांना बेदम मारहाण केली. त्यांच्या कारमध्ये कोयते, सुरे आणि इतर शस्त्रे असल्याचे समजताच संपूर्ण गाव एकत्र आला. यात महिलांचा अधिक समावेश होता. सुमारे दीडशे लोक विरुद्ध ते चार गुंड असा निर्माण झालेला वाद विकोपाला जाण्याची जास्त शक्यता असल्याने कुडचडे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तोपर्यंत ग्रामस्थांनी त्या चारही युवकांना पकडून अर्धनग्न अवस्थेत भरपूर चोप दिला.