

पणजी : पुढारी वृत्तसेवा
प्रवासी वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी नदी परिवहन खाते (आरएनडी) पणजी ते बेती या जलमार्गासाठी दोन नवीन मोठ्या फेरीबोटी बांधणार आहे. त्या कार्यरत झाल्यानंतर या मार्गावरील प्रवासी वाहतूक अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा खात्याने वर्तवली आहे.
या फेरीबोटीत जादा प्रवासी आणि वाहनांसाठी अधिक जागा मिळणार असून त्यांची सुरक्षित वाहतूक होणार आहे. वाहनांची संख्या वाढत असून सध्याच्या फेरीबोटी अपुऱ्या पडत असल्याचे समोर आले आहे. या मार्गावर दोन बोटी सातत्याने प्रवासी वाहतूक करतात आणि तिसरी फेरीबोट राखीव ठेवण्यात येते. गरज भासली किंवा एक बंद पडली तर राखीव फेरीबोट वापरली जाते.
नवीन फेरीबीटीची लांबी २० मीटर असून त्यात १५० प्रवासी तसेच एका वेळेला ८ चारचाकी वाहने सामावू शकतील. सध्या वरील मार्गावर चालू असलेल्या फेरीबोटी १५ मीटर लांब असून प्रवासी क्षमता १०० आहे.
शिवाय चारचाकी वाहने चार ते पाच जाऊ शकतात. त्याऐवजी नवीन जादा क्षमतेची फेरीबोट अधिक सोयीची होणार आहे. फेरीबोटीचा आराखडा (डिझाईन) तयार करण्याचे काम चालू असून याच आर्थिक वर्षात तिची बांधणी सुरू होणार असल्याची माहिती खात्यातील सूत्रांनी दिली.