

मडगाव : दक्षिण गोव्याच्या रासई-लोटली येथील विजय मरीन कंपनीच्या वर्कशॉपमध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मोठ्या स्फोटात वर्कशॉपमध्ये काम करणार्या कामगारांपैकी दोघे कामगार जळून मृत झाल्याच्या घटनेने दक्षिण गोवा हादरला आहे. विजय मरीन शिपयार्डमध्ये बांधकामाधिन जहाजावर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत सात कामगार गंभीररित्या होरपळले.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पर्यवेक्षकाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या आगीत अभिषेक कुमार (वय 25, उत्तर प्रदेश), मनीष चौहान (27, उत्तर प्रदेश), संतोष कुमार (27, उत्तर प्रदेश), मोहम्मद बब्लू (27) आणि आणखी तीन अज्ञात कामगार होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी इस्पितळात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपासानंतर सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्याचे सांगितले. कामगार वेल्डिंगचे काम करत असताना अग्निसुरक्षा साधनांचा योग्य वापर न झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जहाज बांधणीतील पर्यवेक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 106, 115 व 118 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. वर्कशॉपमध्ये एकूण सात कामगार होते, अशी माहिती प्राप्त झाली असून त्यांच्यावर चिंताजनक अवस्थेत गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत तर एका अल्पवयीन मुलाला जिल्हा इस्पितळातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडल्याची माहिती मडगाव अग्निशमन दलाने दिली. विजय मरीन जे वर्कशॉप रासय येथे सुरू असून या वर्कशॉपमध्ये जहाजांची बांधणी आणि दुरुस्तीचे काम केले जाते. जहाजांच्या कामासाठी ऑक्सिजन तसेच एलपीजी गॅसचा वापर केला जातो. या वर्कशॉपमध्ये बोटी, जहाज तयार केले जातात. प्राथमिक तपासात शॉट सर्किटमुळे किंवा गॅस सिलिंडरमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे वर्कशॉप 1985 सालापासून कार्यरत असून, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगार काम करतात. वर्कशॉपमध्ये स्फोटांची मालिका सुरू होताच घटनास्थळी लोकांची गर्दी निर्माण झाली. अग्निशमन दलाला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बंब घेऊन तेही घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या वर्कशॉपमध्ये नेहमी सहा ते सात जण काम करतात. स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर उरलेल्या कामगारांचे काय झाले असा प्रश्न पत्रकारांनी कारखान्याच्या प्रतिनिधीला विचारला असता त्याने काहीही बोलण्यास नकार दिला. वर्कशॉपमध्ये आणखीनही कामगार अडकल्याविषयी त्यांना विचारले असता, त्या प्रतिनिधीने माहिती देण्यास नकार दिला.