

चावडी : वज्रे नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोघा चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भाटपाल नीववाडा धुपेमळ येथे घडली. ऋत्विक धनंजय नाईक (वय ११, रा. कारवार-कर्नाटक) व ध्रुव उदय वडार (वय ७, नवेवाडे-भाटपाल) अशी मृत बालकांची नावे आहेत. यातील ऋत्विक हा शाळेला सुट्टी असल्याने धुपेमळ येथे मावशीकडे आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाटपाल येथील वज्रे नदीकाठी तीन लहान मुले खेळताना आंघोळीसाठी नदीत उतरली. त्यांना नदीच्या खोल पात्राचा अंदाज आला नाही. तिसऱ्या मुलाने अर्धा किलोमीटर अंतरावरील घरी ही माहिती दिली. माहिती मिळताच लोक जमा झाले. यावेळी रोहन या युवकाने धाडसाने नदीत उडी घेऊन शोधाशोध केली. मात्र, काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले.
माहिती मिळाल्यानंतर काणकोण पोलिस व काणकोण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह काणकोण इस्पितळात आणून नंतर उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठवून दिले आहेत.
ध्रुवच्या वडिलांचा रुग्णालयात आक्रोश...
ध्रुव याचे वडील उदय वडार हे खासगी बस चालवतात. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी इस्पितळात आक्रोश केला.
मला आणखी दोन दिवस राहायचेय...!
ऋत्विक नाईक हा नंदनगडा-कारवार येथील असून शाळेला सुट्टी असल्याने धुपेमळ येथे मावशीच्या घरी आला होता. त्याचा मावसा सुरेंद्र देसाई यांनी त्याला शुक्रवारीच नंदनगडा येथे पोहोचविण्याचे ठरविले होते. मात्र, आणखीन दोन दिवस राहण्याची इच्छा त्याने सांगितली. रविवारी त्याला घरी पोहोचविण्याचे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
"उष्णतेचे दिवस असल्याने सध्या वज्रे नदीवर आंघोळीला बरेच लोक येतात. येथे काही तरी उपाययोजना राबवावी." - रामू ऊर्फ धील्लन नाईक, पंच.