

पणजी : गोव्याच्या मुक्ती लढ्यानंतर कायदा व्यवस्थेची मुळे खोलवर रुजली आहेत. यामध्ये व्ही. एम. साळगावकर या राज्यातील पहिल्या कायदा महाविद्यालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाविद्यालयातील परीक्षेमधील गुणांऐवजी विद्यार्थ्याने उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर आणि कष्टांवर विश्वास ठेवायला हवा, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
मिरामार येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे, न्यायाधीश भारती डांगरे, न्यायाधीश महेश एस. सोनक, संस्थेचे अध्यक्ष दत्तराज साळगावकर, प्राचार्य प्रा. डॉ. शबिर अली आदी उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत गुणांना खूप महत्त्व दिले जाते. मी महाविद्यालयात तिसरा आलो होतो, पण तरीही मी देशाचा सरन्यायाधीश म्हणून काम पाहत आहे. स्वतःला शिस्त लावून, प्रामाणिकपणाने कामाप्रती निष्ठा आणि मेहनत घेण्याची तयारी असली की तुम्ही लोकांच्या सेवेसाठी उत्तम वकील बनू शकता. सध्या कायदा क्षेत्रात मोठे बदल झाले असून युवा वकिलांसाठी हे फायद्याचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
गोव्यात उच्च दर्जाचे वकील आहेत, हे वारंवार दिसून आले आहे. यामध्ये साळगावकर कायदा कॉलेजची मोठी भूमिका आहे. या कॉलेजमुळे न्यायव्यवस्थेला उत्कृष्ट वकील मिळतील यात शंका नाही. प्रत्येकाने सत्य न लपवता आणि पैशांच्या मागे न धावता आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले पाहिजे. वकिली क्षेत्र हे केवळ करिअर नसून न्याय व्यवस्थेचा पाया आहे. गोव्यातून असेच उच्च दर्जाचे वकील लोकसेवेसाठी तत्पर असतील, असे प्रतिपादन न्यायाधीश भारती डांगरे यांनी केले.