

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा कायम राहिल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून घरे, मालमत्ता आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात झाडे कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी किमान चार घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
या सर्व घटनांमध्ये सर्वाधिक फटका म्हाऊस गावाला बसला. येथील जयदेव कृष्णा गावकर यांच्या घरावर मोठे झाड कोसळल्याने सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटवून सुमारे पाच लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षित वाचवली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरीतील जनजीवन आधीच विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडत असून घरे, वीजवाहिन्या, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी सकाळी साडेनाऊच्या सुमारास म्हाऊस येथील जयदेव गावकर यांच्या घराशेजारील मोठे झाड उन्मळून थेट घरावर कोसळले. या दुर्घटनेत घराचे छप्पर, भिंती आणि घरातील अनेक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
भिंतींना तडे गेल्याने घराच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतीला धाव घेतल्यानंतर वाळपई अग्निशमन दलाने झाड हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील बोडणवाडा-नालेली येथे रोहन देवगो गावस यांच्या घरावर सागवानाचे झाड कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
घराच्या छपरासह आतील साहित्याचीही नासधूस झाली. वाळपई अग्निशमन दलाने पेट्रोल आणि इलेक्ट्रिकल कटरच्या साहाय्याने झाड हटवून सुमारे ७० हजार रुपयांची मालमत्ता वाचवली. सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील शिर-सावर्डे येथे सरकारी प्राथमिक शाळेजवळ राहणाऱ्या लक्ष्मी पर्येकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाचे अरविंद देसाई, राहुल कवठणकर, रुपेश सालेलकर, आदित्य गावस आणि फटी कलमिस्कर यांनी झाड हटवून सुमारे ६० हजार रुपयांची मालमत्ता सुरक्षित केली.