

पणजी : जुने गोवे, धावजी-गवंडाळी ते खांडोळा या रस्त्यावरील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधले जात आहे. या पुलाचे काम जलद पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. या मार्गावरील वाहतूक बाणस्तारी खोर्लीमार्गे वळवण्यात आली आणि पहिल्याच दिवशी खोर्ली येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या कोंडीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाहनांचा ताफा अडकला. मात्र, त्यांच्यासोबतच्या पोलिसांनी त्यांची वाहन कोंडीतून कशीबशी सुटका केली.
गवंडाळी रेल्वे फाटकामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या केरी, साखळी, होंडा, वाळपई, आमोणा या भागांतील सुमारे 20 ते 25 हजार वाहनांना वारंवार अडकावे लागत असल्याने येथे 38 कोटी खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पुढील सहा महिने हा रस्ता बंद राहणार आहे. या रस्त्यावरून येणारी वाहने बाणस्तारी-खोर्लीमार्गे वळवल्यानंतर पहिल्याच दिवशी कोंडी झाली. या कोंडीमुळे अनेकांना कामावर पोचण्यास उशीर झाला तसेच अनेकांची महत्त्वाची कामे रखडली. पुढील चार ते पाच महिने ही वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
पणजी ते फोेंडा हा राष्ट्रीय हमरस्ता बहुतांश जागी रुंद करण्यात आलेला आहे, मात्र खोर्ली येथे त्याचे रुंदीकरण मागील 15 वर्षांपासून रखडले आहे. तेथील काही नागरिकांच्या विरोेधामुळे हे रुंदीकरण रखडले आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग अनेक वर्षे अरुंद ठेवल्यामुळे पूर्वीपासून येथे वाहतूक कोंडी होत होती. आता त्यात भर पडली आहे, त्यामुळे येथील रस्ता रुंदीकरणाची मागणी होत आहे.
बाणस्तारी-खोर्ली रस्त्यावर कोंडी होत असल्याने काही वाहन चालकांनी गवंडाळीहून आयडीसीच्या आतील भागांतून वाहने जुने गोवेकडे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो रस्ताही अरुंद असल्याने तेथेही वाहतूक कोेंडी झाली.
खोर्ली येथील वाहतूक कोंडीची दखल कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी घेतली आहे. गवंडाळी रस्ता सकाळी 10 पूर्वी व संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीला खुला ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र रस्त्यावरून मोठी वाहने ये-जा करणे शक्य नसल्यामुळे लहान वाहनांसाठी रस्ता निर्धारीत वेळेत खुला राहील, असे आमदार फळदेसाई यांनी म्हटले आहे.