Goa News : माशेलमध्ये 'जय हरी विठ्ठल'चा नारा

फोंड्यातही चिखलकाला सोहळ्याला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
Goa News
माशेलमध्ये 'जय हरी विठ्ठल'चा नारा
Published on
Updated on

माशेल/फोंडा : आषाढी एकादशीनिमित्त श्री देवकीकृष्ण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या २४ तासांच्या अखंड भजनी सप्ताहाची सांगता रविवारी द्वादशीच्या दिवशी दुपारी पारंपरिक चिखलकाल्याने उत्साहात झाली. "जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल" या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

भजनी सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर प्रज्वलित समईतील तेल अंगाला लावून देऊळवाड्यातील विठ्ठलभक्त पारंपरिक चिखलकाला साजरा करण्यासाठी मैदानात उतरले. प्रथम एकमेकांच्या कपाळावर टिळा लावण्यात आला. त्यानंतर मृदंग आणि टाळांच्या गजरात मातीशी नाळ जोडणाऱ्या विविध पारंपरिक खेळांना सुरुवात झाली. यावेळी मनोरंजक चक्र, बेडूक उड्या, आंधळी कोशिंबीर, अंताक्षरी, घोडागाडी, आरोळी ठोकणे तसेच नवरा-नवरी बनून विवाह सोहळ्याचे सादरीकरण अशा विविध खेळांमध्ये बालगोपाळांसह हरिभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

"यारे गडी, यारे गोपाळ गाडी यारे..." हे पारंपरिक लोकगीत गात सहभागी झालेल्यांनी चिखलकाल्याचा मनमुराद आनंद लुटला. कृष्णक्रीडा संपल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भाविकांनी नवसपूर्तीसाठी आणलेला प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व हरिभक्तांनी पारंपरिक विहिरीवर स्नान करून चहा-फराळाचा आस्वाद घेत आपापल्या घरी प्रस्थान केले. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला माशेलचा चिखलकाला यंदा सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरावरील उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या उत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी गोवा पर्यटन खात्याने केलेल्या प्रयत्नांचे माशेलकरांकडून कौतुक करण्यात येत आहे. माशेलच्या चिखलकाल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे गोवा पर्यटन खात्याला भारत सरकारचा पुरस्कारही प्राप्त झाला असून, ही बाब माशेलवासीयांसाठी अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, फोंड्यातील श्री विठोबा देवस्थानात आषाढी एकादशी उत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त रविवारी पारंपरिक चिखलकाला भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या पारंपरिक चिखलकाल्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. "जय विठ्ठल, हरी विठ्ठल"च्या अखंड गजरात विविध पारंपरिक आणि मनोरंजक खेळ खेळण्यात आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदवत चिखलकाल्याचा मनमुराद आनंद लुटला. भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम असलेल्या या चिखलकाल्यामुळे मंदिर परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news