पणजी : पुढारी वृत्तसेवा
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिसवाडी तालुक्यातील जीम मालक निर्णय नितीन भट याच्याविरुद्ध महिला पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीची माहिती मिळताच संशयित पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची संशयिताशी जीममध्ये ओळख झाली. ही महिला जीममध्ये येत होती. त्यामुळे त्यांची एकमेकांशी जवळीक वाढत गेली. त्यानंतर संशयिताने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला व त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत राहिला, असे तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिला व संशयित यांच्यातील लैंगिक संबंधांतून ती गरोदर राहिली. त्यामुळे तिने संशयिताला लग्न करण्याचा लगादा लावला मात्र त्याने धमकी देत विवाहास नकार दिला.
तिची फसवणूक केल्याप्रकरणी महिला पोलिस स्थानकात पीडित महिलेने तक्रार दाखल केली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, महिला पोलिस स्थानकाच्या पथकाने संशयिताच्या जीममध्ये व त्याच्या राहत्या घरी शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पीडित महिलेकडून पुरावे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.