

पणजी : ‘तिळारी’चे पाणी सोमवारपर्यंत गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तर गोव्याला आवश्यक पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. त्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी गोव्यातील तिळारी जलस्रोत खात्याचे अधिकारी तिळारीत ठाण मांडून आहेत.
कुडासे कलमी येथे शुक्रवारी (दि.24) तिळारीचा कालवा फुटला. त्यामुळे गोव्याचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. कालव्याला भगदाड पडले आहे, शिवाय कालव्यावरून ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेला मातीचा रस्ता अर्ध्याहून अधिक वाहून गेला आहे. कुडासे येथील हा कालवा तिसर्यांदा फुटला आहे. कालव्याखालून डाव्या बाजूने उजवीकडे जंगलातील पाणी जाण्यासाठी सिमेंटची पाईपलाईन घातली आहे. ती पाणी व मातीच्या दबावाने फुटल्याने त्यातून पाणी बाहेर पडले आणि कालवा फुटला असा प्रकल्प अधिकार्यांचा दावा आहे. मागच्यावेळी कालवा फुटल्यानंतर त्याची दुरुस्ती करताना हे पाईप बदलले असते तर पुन्हा कालव्याला भगदाड पडण्याची आणि उत्तर गोव्यात पाणी समस्या उद्भवली नसती. यावेळी मात्र त्या पाईपांच्या ठिकाणी नवे पाईप घालण्याचे काम चालू आहे. गोव्यातील मुख्य अभियंता प्रमोद बदामी, सहाय्यक अभियंता आनंद पंचवाडकर, चराठे येथील कार्यकारी अभियंता विनायक जाधव कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. येत्या रविवारपर्यंत काम पूर्ण करून गोव्याला पाणी सोडण्यात येईल, असे प्रकल्प अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे वेळेत काम पूर्ण झाले तर सोमवारपर्यंत उत्तर गोव्याला पाणी मिळण्याची शक्यता आहे. तिळारी धरणातून अस्नोडा जल शुद्धीकरण प्रकल्पाला कच्चे पाणी येते. ते बंद असल्याने आमठाणे धरणातून पाणी उचलून ते अस्नोड्याला देण्याचा विचार सरकार करत आहे. तो प्रत्यक्षात आला तर बार्देश तालुक्यासह पर्वरी परिसरातील पाणी टंचाई काही अंशी कमी होणार आहे.